ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 22 - उत्तर प्रदेशात दहशतवादी हल्ला करत मोठा घातपात घडवण्याचा कट आखण्यात आला असून यासाठी साधूंच्या वेशात भगवे कपडे परिधान करत दहशतवादी घुसण्याची शक्यता आहे. दहशतवादी संघटनांनी यासाठी तरुणांची निवड केली असून त्यांना हिंदू धर्माचं प्रशिक्षण दिलं आहे. धार्मिक स्थळ आणि प्रतिष्ठित संस्था दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहेत. मध्य प्रदेश पोलिसांच्या गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर उत्तर प्रदेशातील सर्व सुरक्षा संस्थांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्रीपासून गुप्तचर संस्थांनाही सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.
काय आहे माहिती -
मध्य प्रदेश पोलिसांच्या गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाठवण्यात आलेले तरुण 17 ते 18 वर्षांचे आहेत. या सर्वांना हिंदू धर्माच्या रुढी, परंपरांची माहिती देण्यात आली आहे. हे सर्वजण साधू, संतांच्या वेशात असतात. याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात दहशतवादी संघटनेने 20 ते 25 तरुणांना भारत - नेपाळ सीमारेषेवरुन मध्य प्रदेशात पाठवलं आहे. उत्तर प्रदेशात प्रवेश केल्यानंतर हिंदू वस्तींमध्ये त्यांनी वास्तव्य केलं आहे. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांपासून वाचण्यासाठी दहशतवाद्यांनी आपलं नावही बदललं असून भाड्याच्या घरात राहत आहेत. अयोध्या, काशी, मथुरा याशिवाय ताजमहल, अलाहाबाद आणि लखनऊ उच्च न्यायालय इमारत, विधान भवन, सतिवालय याशिवाय रेल्वे स्टेशन आणि गर्दीची ठिकाणं दहशतवाद्यांच्या रडारवर आहेत.
ऑपरेशन कृष्णा इंडियाशी संबंध -
पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयने हिंदू धर्माचं प्रशिक्षण देत हस्तकांना हिंदू वस्तीत प्रवेश करुन देण्यासाठी ऑपरेशन कृष्णा इंडिया सुरु केलं होतं. हे एजंटदेखील त्याचाच भाग असण्याची शक्यता आहे. या हस्तकांना साधूंच्या वेशात धार्मिक स्थळांवर पाठवून आपलं काम करुन घेण्याची योजना आहे. यानंतर हे लोक धार्मिक द्वेष पसरवत मोठा घातपात घडवण्याचा कट आखू शकतात.