नवी दिल्ली - पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी गट सक्रीय झाल्याची माहिती आहे. चेन्नईमधील एका कार्यक्रमात लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी सांगितले की, भारताने एअरस्ट्राइक करत बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र मागील 8 महिन्यांपासून त्या जागेवर पुन्हा दहशतवादी कारवाया सुरु झाल्याचं दिसून येत आहे. बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी कॅम्पला भारतीय हवाई दलाने नष्ट केले होते.
लष्कर प्रमुख बिपीन रावत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की, भारतीय सैन्य पुन्हा एकदा एअरस्ट्राईक करणार का? यावर ते म्हणाले की, आम्ही एअर स्ट्राइक पुन्हा का करणार? यापुढेही जाऊ शकत नाही का? असं सांगत एकप्रकारे लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. भारतीय लष्कर सीमेवर पूर्णपणे सज्ज आहे. नियंत्रण रेषेवर जवान तैनात आहेत असं त्यांनी म्हटलं. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कायम आहे. भारताच्या उत्तर आणि पश्चिमी सीमेवर तणाव कायम आहे. आमच्या शेजारील राष्ट्रासोबत संबंध ताणले गेले आहेत असं सांगून पाकिस्तान आणि चीन यांच्यावर लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी निशाणा साधला आहे. युद्धात कोणीही उपविजेता नसतो. फक्त जिंकणे महत्वाचे असते. भविष्यात सायबर युद्ध होईल. त्यासाठी आपल्याला आवश्यक तयारी करणे गरजेचे आहे असंही रावत यांनी सांगितले.
बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी प्रशिक्षण तळ आता पुन्हा सक्रिय करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करून हल्ले चढविण्यासाठी सध्या बालाकोटमध्ये ४० दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्यावर जवाबी कारवाई म्हणून भारताने बालाकोटचे दहशतवादी तळ नष्ट केले होते. मात्र, काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम भारताने रद्द केल्यानंतर अंगाचा तिळपापड झालेल्या पाकिस्तानच्या आशीर्वादाने जैश-ए-मोहम्मदने आपले हे तळ पुन्हा सुरू केले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सोमवारी होणाऱ्या आमसभेत काश्मीरच्या मुद्यावर पुन्हा आकांडतांडव करण्याचाही पाकिस्तानचा मनसुबा आहे.