ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. १७ - अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करतील. पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसमध्ये सादर झालेले विधेयक ट्रम्प यांच्याकडे आल्यानंतर ते या विधेयकाला मंजुरी देतील अशी माहिती शलभ कुमार यांनी दिली.
भारतीय वंशाचे शलभ कुमार उद्योगपती असून ट्रम्प यांच्या सल्लागार समितीमधील एक सदस्य आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये चांगले संबंध असून ट्रम्प यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध नवी उंची गाठतील असे शलभ कुमार यांनी इकोनॉमिक टाइम्लसला सांगितले.
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर सप्टेंबर महिन्यात टेड पोइ आणि दाना रोहराबाचे या अमेरिकन काँग्रेसमधील दोन सदस्यांनी पाकिस्तानला दहशतवादी घोषित करण्यासाठी विशेष विधेयक मांडले. ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली आहे. कुठल्याही परिस्थितीत दहशतवाद खपवून घेणार नाही हे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे.