नवी दिल्ली- भारतातला मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमची मुंबईस्थित कोट्यवधींची मालमत्ता सरकारनं जप्त करण्याचा मार्ग मोकळा झालाय. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात दाऊदची आई अमिनाबाई कासकर आणि दाऊदची बहीण हसिना पारकर यांची याचिका फेटाळून लावली. दाऊदची ही मालमत्ता मुंबईतल्या नागपाडा भागात असून, दाऊदची बहीण आणि आईनं या मालमत्तेवर दावा केला होता. परंतु सद्यस्थितीत दाऊदची आई आणि बहीण हयात नाही.
1988मध्ये सरकारनं दाऊदची ही मालमत्ता जप्त केली होती. पण त्यानंतर अमिना कासकर आणि हसिना पारकर यांनी न्यायालयात सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका केली होती. न्यायदंडाधिकारी आणि दिल्ली उच्च न्यायालयानं या दोघींची याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. दाऊद इब्राहिम 1993मधल्या मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आहे. या दहशतवादी हल्ल्यात 257 मुंबईकरांना स्वतःच्या प्राणांना मुकावं लागलं होतं. तसेच अनेक जण जखमीही झाले होते. या हल्ल्यानंतर दाऊद इब्राहिम देश सोडून पळाला. 2012मध्ये सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात सुनावणी करताना अमिना कासकर आणि हसिना पारकर यांना मालमत्तेचे दस्तावेज दाखवण्यास सांगितले होते. परंतु दोघींनाही मालमत्तेचे दस्तावेज न्यायालयात सादर करता आलेले नाहीत.दाऊदच्या आई- बहिणीच्या नावावर मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तीत 7 मालमत्ता आहेत. ज्यातील दोन अमिना यांच्या नावावर होत्या, तर 5 मालमत्ता हसिना पारकर यांच्या नावे होत्या. दाऊदला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनंही जागतिक दहशतवादी घोषित केलं आहे. दक्षिण मुंबईतलं दाऊदचं एक हॉटेल आणि गेस्ट हाऊसचा सरकारनं पहिलाच लिलाव केला आहे. भारताच्या आग्रहाखातर इतर देशांनीही दाऊदची मालमत्ता जप्त करण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे. दाऊद सध्या पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या नजरकैदेत आहे.