इम्फाळ: मणिपूर येथील जिरिबाम जिल्ह्यातील एका गावावर दहशतवाद्यांनी शनिवारी पहाटे हल्ला केला. गावातील घरांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला तसेच बॉम्बहल्लेही केले. त्यात किती जण जखमी झाले किंवा जीवितहानी झाली याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. या दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सीआरपीएफ जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले असून ही चकमक काही तास सुरू होती.
बोरोबेक्रा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावावर हा हल्ला चढविण्यात आला. दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी सीआरपीएफच्या तुकड्या त्या ठिकाणी रवाना करण्यात आल्या होत्या. बोरोबेक्रा येथील वृद्ध व्यक्ती, महिला, मुले यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. वांशिक संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी तोडगा काढण्याकरिता मैतेई, कुकी जमातीच्या आमदारांमध्ये दिल्ली येथे बैठकीत चर्चा झाली होती.
दोन दहशतवाद्यांना केली अटक
मणिपूरमधील पूर्व इम्फाळमधून प्रतिबंधित मुटुम इनाव सिंह (३१ वर्षे), खवैरकपम राजेन सिंह (२५ वर्षे) या दहशतवाद्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. कांगलीपाक कम्युनिस्ट पार्टीचे (पीपल्स वॉर ग्रुप) हे दोघे दहशतवादी आहेत.
‘शस्त्रीकरण कमी झाल्यास स्थिती पूर्वपदावर येईल’
समाजाच्या शस्त्रीकरणाचे प्रमाण कमी झाले की मणिपूरमध्ये स्थिती पूर्वपदावर येण्यास मदत होईल, असे पोलिस महासंचालक राजीव सिंह यांनी सांगितले. मणिपूर पोलिस दलाच्या १३३व्या स्थापना दिनानिमित्त आयोजिलेल्या समारंभानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, मणिपूरमधील स्थिती सध्या खूप गुंतागुंतीची आहे.