श्रीनगर - कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर देशातील इतर भागातील नागरिकांना काश्मीरचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र असे नागरिकत्व मिळवणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. कलम ३७० हटवल्यानंतर भूमी कायद्यात झालेल्या बदलांनुसार सर्वप्रथम नागरिकत्व प्रमाणपत्र घेणाऱ्या सतपाल निश्चल यांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. ६५ वर्षीय पंजाबी ज्वेलर सतपाल निश्चल यांच्या हत्येमुळे व्यापारी वर्गामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सतपाल निश्चल हे काश्मीरमध्ये निवासी प्रमाणपत्र घेणारे पहिले व्यक्ती होते. शेजाऱ्यांनी सांगितले की, निश्चल सरायबाला येथे सुमारे १७ वर्षे भाडेकरू म्हणून राहत होते. मात्र निश्चल यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर प्रगती केली आणि श्रीनगरमधील आलिशान अशा इंदिरानगर परिसरात घर घेतले होते. ते तिथे २५ वर्षांपासून राहत होते.अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवा भूमी कायदा लागू झाल्यानंतर निश्चल आणि त्यांच्या कुटुंबासाठी नागरिकत्वाचे डोमिसाइल सर्टिफिकेट हल्लीच जारी झाले होते. निश्चल यांनी नवा भूमि कायदा अस्तित्वात आल्यानंतर स्वत:साठी आणि कुटुंबासाठी डोमिसाइल सर्टिफिकेट तयार करण्याचा निर्णय घेतला होता.सूत्रांच्या म्हणण्यानुसार सतपाल निश्चल यांनी घेतलेले डोमिसाइल सर्टिफिकेट हेच त्यांच्या हत्येचे कारण ठरले आहे. काश्मीरच्या बाहेरली लोकांनी जर येथील निवासी प्रमाणपत्र घेणयाचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरसुद्धा अशीच वेळ येईल, असे सांगण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी या हत्येच्या माध्यमातून केला आहे.पोलिसांच्या म्हणण्यानुसार निश्चल यांची हत्या ही दहशतवादी हल्ल्यात झाली आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. मात्र निश्चल यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांनी याप्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र ही हत्या बाहेरील लोकांना घाबरवण्यासाठी करण्यात आल्याचे अनेक लोकांचे मत आहे.