श्रीनगर - श्रीनगर विमानतळाजवळच्या बीएसएफ कॅम्पवर ऑक्टोबरमध्ये झालेल्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या नूर मोहम्मद तांत्रे (४७) हा जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ठार झाला. नूर मोहम्मदच्या शोधात असताना मिळालेल्या गुप्त सूचनेनंतर पोलिसांनी सांबुरा भागात एका घराला सोमवारी रात्री घेरले. रात्रभर चकमक सुरू होती. त्यात नूर मोहम्मद मारला गेला असून, मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह जवानांनी ताब्यात घेतला. मात्र, त्याच्यासोबत रात्रभर चकमकीत सहभागी असणारे २ दहशतवादी पळून गेले. नूर मोहम्मद उर्फ नूर तराली हा सुरक्षा दलासाठी डोकेदुखी बनला होता. काश्मीर खो-यात अशांतता पसरविण्यात त्याचा मोठा हात होता.
नूर मोहम्मद हा तोच दहशतवादी आहे, जो 2003 साली भाजपात सामील होऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची हत्या करण्याचा कट आखत होता. मिळालेल्या माहितीनुसार, पीर बाबा नावाने प्रसिद्ध असलेला हा चार फूट उंचीचा दहशतवादी नूर मोहम्मद दिल्लीमधील अशोका रोडवरील भाजपा मुख्यालयातदेखील जाऊन आला होता. त्यावेळी एक सक्रीय कार्यकर्ता असल्याची बतावणी करत पक्षाच्या सदस्यत्वाचा फॉर्म घेण्यात तो यशस्वी झाला होता.
डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, त्यावेळी त्याने पक्षाच्या नेत्यांवर लक्ष ठेवण्याचा आणि हल्ला करण्याचा कट आखला होता. पण त्याने पुढचं पाऊल उचलण्याआधीच त्याला आणि साथीदाराला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाच्या दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली. त्यावेळी दोघांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठी जप्त करण्यात आला होता.
नूर मोहम्मदनं जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचे समर्थन केले होते ज्यांनी ऑगस्ट महिन्यात पुलवामा जिल्ह्यात पोलीस लाईनवर हल्ला केला होता. ऑगस्ट महिन्यात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात 8 सुरक्षा रक्षक शहीद झाले होते तर यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. याशिवाय, 3 ऑक्टोबरला श्रीनगर इंटरनॅशनल एअरपोर्टबाहेर बीएसएफ कॅम्पवर करण्यात आलेल्या हल्ल्यामागेही नूर मोहम्मदचा हात असल्याचं बोललं जात होतं. या हल्ल्यात एक बीएसएफ अधिकारी शहीद झाला होता तर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.
जानेवारी 2011मध्ये दिल्लीच्या पीओटी कोर्टनं नूर मोहम्मद तंत्रेसहीत अन्य चार जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दिल्लीतील तिहार जेलमध्ये काही काळ शिक्षा भोगल्यानंतर त्याची रवानगी श्रीनगरच्या जेलमध्ये करण्यात आली. यावेळी 2015मध्ये मोहम्मदला काही दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात आले, यामध्ये जम्मू काश्मीर हाय-कोर्टानं कित्येकदा वाढदेखील केली. पॅरोलच्या जवळपास तीन महिन्यानंतर मोहम्मद अंडरग्राऊंड झाल्याची माहिती समोर आली होती.
नूर मोहम्मद ठार झाल्याचे वृत्त पसरताच काश्मीरमध्ये शेकडो तरुण रस्त्यावर उतरून भारतविरोधी घोषणा देऊ लागले. सुरक्षा जवानांवर त्यांनी दगडफेकही केली. त्यामुळे जवानांना त्यांच्यावर अश्रुधूर सोडावा लागला.