नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतून एका पाकिस्तानी दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या दहशतवाद्याकडून AK-47 बंदूक आणि मोठ्याप्रमाणात दारुगोळा जप्त केला आहे. पूर्व दिल्लीतील शास्त्री नगरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. लष्कर ए तोयबाचा हा दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच दिल्लीत दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यामुळे, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने हल्लाबोल केला आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने UA(P) Act, एक्सप्लोसिव्ह अॅक्ट (Explosive Act) आणि आर्म्स अॅक्ट (Arms Act) अंतर्गत या दहशतवाद्याला अटक केली आहे. मोहम्मद अशरफ उर्फ अली असे अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचे नाव आहे. हा दहशतवादी पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा रहिवासी असून, तो मोहम्मद अशरफ अली अहमद नूरी या नावाने दिल्लीच्या शास्त्रीनगरमध्ये राहत होता. पोलिसांनी दहशतवाद्याकडून AK-47, काडतूस आणि ग्रेनेड जप्त केले आहेत. याशिवाय, बनावट कागदपत्रांच्या मदतीने दहशतवाद्याने बनवलेले भारताचे ओळखपत्रही पोलिसांच्या हाती लागले आहे.
दहशतवाद्याची चौकशी सुरू
दिल्ली पोलिसांना अनेक दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती की एक पाकिस्तानी दहशतवादी राजधानीत लपला आहे. पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडण्याचा आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा दिल्ली पोलीस सातत्याने प्रयत्न करत होते. सध्या दहशतवादी मोहम्मद अशरफ यांची चौकशी केली जात आहे. त्याच्यासोबत आणखी किती लोक आहेत हे जाणून घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. दहशतवादी मोहम्मद अशरफचे साथीदार इतर अनेक ठिकाणी लपले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. दिल्ली पोलीस इतरही अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत.