ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 03 - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बॅंक लुटल्याची घटना बुधवारी घडली. गेल्या तीन दिवसांत दहशतवाद्यांनी बॅंक लुटल्याची ही तिसरी घटना आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील नेहामा काकापोरा परिसरात असलेल्या इलाकाई देहाती बॅंकेवर चार बंदुकधारी दहशतवाद्यांनी बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकला. या दरोड्यात दहशतवाद्यांनी तीन ते चार लाख रुपयांची रोडक लंपास केली. याप्रकरणी बॅंकेच्या अधिका-यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सर्व ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.
याचबरोबर जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांनी पुन्हा बँक लुटल्याची घटना काल (दि.2) घडली होती. यावेळीही येथील कादर येरीपोरा परिसरात असलेल्या इलाकाई देहाती बॅंकेच्या शाखेवर दहशतवाद्यांनी दरोडा टाकला. या दरोड्यात 65, 000 रुपयांची रोकड लुटून पोबारा केला होता. तर, परवाच्या दिवशी म्हणजेच सोमवारी (दि.1) जम्मू-काश्मीर बँकेच्या कॅश व्हॅनवर कुलगामजवळ दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन बँक कर्मचारी व पाच पोलीस असे सात जण ठार झाले. यावेळी दहशतवाद्यांनी 50 लाख रुपये आणि शस्त्रे घेऊन पळ काढला. या हल्ल्याची जबाबदारी हिजबुल मुजाहिद्दीनने स्वीकारली आहे.
दरम्यान, कुलगाममधील बॅंक लुटणार्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून या दहशतवाद्यांची माहिती देणार्यास पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर पोलिसांकडून जाहीर करण्यात आले आहे.
j&K: Another bank looted today by terrorists in Pulwama, this time in Nehama Kakapora area. pic.twitter.com/IZsTBOncF5— ANI (@ANI_news) May 3, 2017