लखनौ : सौदी अरबमध्ये बनावट पासपोर्टप्रकरणी शिक्षा भोगल्यानंतर भारतात प्रत्यार्पित करण्यात आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या संशयित दहशतवाद्यास उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि तेलंगणा पोलिसांनी येथील चौधरी चरणसिंग विमानतळावर अटक केली. मूळ हैदराबाद येथील रहिवासी असलेला अब्दुल अझीज याला मंगळवारी सायंकाळी जेद्दाह येथून लखनौला आलेल्या विमानातून उतरताच अटक करण्यात आली. तेलंगणातील एका मंदिरात बॉम्बस्फोटप्रकरणी तो हवा होता. यापूर्वी तो चेचन्या आणि बोस्नियाला जाऊन आला असून तेथील दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. अझीजला इ.स. २००१ मध्ये हैदराबादेत बनावट पासपोर्टप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो २००३-०४ साली सौदी अरबमध्ये बनावट पासपोर्टद्वारे इराकला जाण्याच्या प्रयत्नात असताना पकडला गेला होता. (वृत्तसंस्था)
लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यास अटक
By admin | Published: February 04, 2016 3:00 AM