नवी दिल्ली : जैश-ए-मोहम्मद संघटना म्यानमारमधील काही निर्वासित रोहिंग्या मुस्लिमांना बांगलादेशात अतिरेकी प्रशिक्षण देऊन भारतात अतिरेकी हल्ला करण्याचा कट आखत असल्याचे उघडकीस आले आहे. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली. जैशच्या एका दहशतवाद्याने चार रोहिंग्यांना अतिरेकी प्रशिक्षण दिल्याचेही वृत्त आहे.
बीएसएफने अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानातील जैशचा कमांडर साबेर अहमद हा बांगलादेशातील कॉक्स बाजारातील रोहिंग्या मुस्लिमांना भारतात हल्ला करण्यासाठी कट्टरवादी बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. बांगलादेशातील जैश-ए-मोहम्मदच्या शाखेचा सदस्य मौलाना युनूस याने चार रोहिंग्यांना अतिरेकी प्रशिक्षण दिले आहे.
गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार, पाकिस्तानातील अतिरेकी संघटनेच्या मदतीने भारतात सुरक्षा दलावर मोठा हल्ला करण्याचा कट शिजत आहे. जैशचा आॅपरेशन कमांडर अब्दुल रऊफ याच्यावर हल्ला करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. असगर व अन्य ३० ते ४० अतिरेकी नियंत्रणरेषेवरील लॉन्च पॅडवर हल्ल्याच्या तयारीत आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीला गुप्तचर विभागाने सात राज्यांत हाय अॅलर्ट जारी केला होता. जैश-ए-मोहम्मद ही अतिरेकी संघटना काश्मीर खोरे व अन्य राज्यांत मोठे अतिरेकी हल्ले करू शकते, असे म्हटले होते. (वृत्तसंस्था)पहाडी भागात ट्रेनिंगपाकिस्तानातील आयएसआयच्या मदतीने जैशने बांगलादेशमध्ये आपले स्लीपर सेल सक्रिय केले आहेत.बांगलादेशच्या हरिनमारा पहाडी भागात अतिरेकी प्रशिक्षणासाठी एक कॅम्प तयार करण्यात आला आहे.कॉक्स बाजारमध्ये सध्या हजारो रोहिंग्या आश्रयाला आहेत. त्यांना जाळ्यात ओढून अतिरेकी प्रशिक्षण दिले जात आहे.