श्रीनगर - दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार केला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले आहेत. 'पुलवामामधील राजपोरा येथे पोलीस स्थानकाजवळच दहशतवाद्यांनी पथकावर हल्ला केला. हल्ल्यात दोन जवान जखमी झाले आहेत', अशी माहिती पोलीस उपमहानिरीक्षक एस पी पनी यांनी दिली आहे.
जखमी पोलीस जवानांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. हल्ल्यानंतर परिसरात नाकेबंदी करण्यात आली असून, दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरु करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक एस पी पनी यांनी दिली आहे.
हा हल्ला पोलीस ठाण्यावर झाला नसल्याचं एस पी पनी यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान जखमी जवानांची ओळख पटली असून अब्दुल सलाम आणि मुनीर अहमद अशी त्यांची नावे आहेत.