नवी दिल्ली: नौसेना प्रमुख सुनील लांबा यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा साधला. भारताला अस्थिर करण्याच्या मानस असलेल्या एका देशाकडून मिळालेल्या मदतीच्या जोरावर कट्टरतावाद्यांनी पुलवामा हल्ला घडवून आणला, असं लांबा म्हणाले. दहशतवादी सागरी मार्गानं देशात घुसण्यासाठी प्रशिक्षण घेत असल्याची माहिती आपल्याकडे असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. भारतात हल्ले घडवण्यासाठी दहशतवादी सागरी किंवा अन्य मार्गांचा वापर करू शकतात, असं सुनील लांबा म्हणाले. त्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात असल्याची माहितीदेखील आमच्याकडे उपलब्ध आहे, असं लांबा यांनी सांगितलं. जम्मू-काश्मीरच्या पुलवामात 14 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदनं सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला. त्यामध्ये 40 जवान शहीद झाले. याआधी दहशतवाद्यांनी 26/11च्या हल्ल्यावेळी सागरी मार्गाचा वापर केला होता. हिंदी-पॅसिफिक विभाग संवाद कार्यक्रमात सुनील लांबा बोलत होते. यावेळी संरक्षण क्षेत्राशी संबंधित विशेष तज्ज्ञ आणि राजदूत उपस्थित होते. 'आता नव्या प्रकारचा दहशतवाद दिसू लागला आहे. जगातील मोजकेच देश या प्रकारच्या दहशतवादापासून स्वत:चा बचाव करू शकले आहेत. दहशतवाद हे जगापुढील आव्हान आहे. जगासमोरील ही समस्या वाढतच आहे. दहशतवादाचं नवं स्वरुप आणि त्याची व्यापकता चिंताजनक आहे,' असं लांबा म्हणाले. भारत दहशतवादाचा पीडित असून ही समस्या अतिशय गंभीर असल्याचं नौदल प्रमुखांनी सांगितलं. यावेळी त्यांनी नाव न घेता पाकिस्तानवर टीका केली. 'जवळपास तीन आठवड्यांपूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला. भारताला अस्थिर करण्याची मानस बाळगणाऱ्या देशाच्या मदतीनं दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला,' असं लांबा यांनी म्हटलं.
दहशतवादी सागरी मार्गानं भारतात घुसण्याच्या तयारीत; नौदल प्रमुखांकडून खबरदारीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 2:48 PM