लखनऊ: अल कायदाच्या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्यानं उत्तर प्रदेशात होणाऱ्या कारवाया टळल्या. अल कायदाचा दहशतवादी मिनहाज अहमदनं त्याच्या म्होरक्यांच्या इशाऱ्यावर मे महिन्यातच उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊसह अनेक शहरांमध्ये बॉम्ब स्फोट घडवणार होते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं राज्यात लॉकडाऊन लागू झाला. त्यामुळे दहशतवाद्यांना योजनेत बदल करावा लागला.
मिनहाज अहमद आणि मसीरुद्दीन यांनी त्यांच्या म्होरक्यांच्या आदेशावरून अनेक शहरांमध्ये घातपात घडवून आणण्याची संपूर्ण योजना आखली होती. मानवी बॉम्बच्या माध्यमातून योजना अंमलात आणली जाणार होती. त्यासाठी त्यांनी उन्नावमध्ये राहणाऱ्या शाहिद आणि कानपूरच्या अनेक तरुणांना तयार केलं होतं. मात्र मे महिन्यात राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढला. त्यामुळे सरकारनं लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊन लागू झाल्यानं रस्त्यावरील, प्रमुख भागांमधील गर्दी कमी झाली. त्यामुळे मिनहाज आणि त्याचे साथीदार लॉकडाऊन संपण्याची वाट पाहत होते.
मिनहाज आणि त्याचे साथीदार स्फोट घडवून आणण्यासाठी गर्दी असलेल्या जागांचा शोध घेत होते. स्वातंत्र्य दिनाच्या जवळपास घातपात घडवून आणण्याची त्यांची योजना होती. त्यामुळे मिनहाज आणि मसीरुद्दीन यांनी घरातच कुकर बॉम्ब तयार करण्याचं काम सुरू केलं. मिनहाज आधी लॅब तंत्रज्ञ म्हणून काम करायचा. त्यानं जानेवारी २०१६ मध्ये नोकरी सोडली. त्यानंतर तो काकोरीतल्या त्याच्या घरातून दहशतवादाचा प्रचार-प्रसार करायचा.
मिनहाजनं इंटरनेटच्या माध्यमातून एक ग्रुप तयार केला. त्यानं या माध्यमातून तरुणांना जोडण्याचं काम केलं. यामध्ये कानपूरसह अन्य शहरांमधील काश्मिरींचादेखील समावेश होता. त्यांना दहशतवादाचे धडे देण्याचं काम मिनहाज करायचा. एटीएस आणि गुप्तचर विभागानं त्याच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यास सुरुवात केली आहे. मिनहाज लॅबमध्ये काम करत असतानाही तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना धार्मिक मुद्द्यांवरून भडकवायचा. मात्र त्याला तिथल्या वरिष्ठांनी विरोध केला. त्यामुळेच मिनहाजनं नोकरीचा राजीनामा दिला.