श्रीनगर - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांच्या कुटुंबीयांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. दहशतवाद्यांनी काश्मीर पोलीस दलातील सहा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे अपहरण केले आहे. दहशतवाद्यांनी गुरुवारी संध्याकाळी दक्षिण काश्मीरमधील पोलिसांच्या घरात घुसून कुटुंबीयांचे अपहरण केले. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. गेल्या काही दिवसांत सुरक्षा दलांनी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेऊन काही दहशतवाद्यांना अटक केली होती. त्या पार्श्वभूमीवर हे अपहरण म्हणजे पोलीस खात्यावर दबाव आणण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेली खेळी असल्याचे पोलीस खात्यांमधील सूत्रांचे म्हणणे आहे. बुधवारी त्राल परिसरामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. या मुलाच्या कुटुंबीयांनी दयाभावना दाखवून दहशतवाद्यांनी आपल्या मुलाची मुक्तता करावी, अशी विनंती केली आहे. या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची मुक्तता व्हावी यासाठी पोलीस खाते प्रयत्नशील आहे.
कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी खारपोरा येथील पोलीस कर्मचारी बशीर अहमद यांचा मुलगा फैजान आणि येरिपोरा येथील पोलीस कर्मचारी अब्दुल सालेम यांचा मुलगा सुमेर अहमद, काटापोरा येथील डीएसपी इजाज अहमद यांचा भाऊ गौहर अहमद याचेही अपहरण झाल्याचे वृत्त आहे. तर मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातसुद्धा एका पोलीस कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाला दहशतवाद्यांनी मारहाण केली. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी चार पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना अटक केल्याचा तसेच त्यांच्या घरांना आग लावल्याचा आरोप करून काश्मीर खोऱ्यात निषेध आंदोलने करण्यात आली. दरम्यान, दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे अपहरण करण्याची गेल्या 28 वर्षांमधील ही पहिलीच वेळ आहे.