नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात ‘जैश-ए-मोहम्मद’चा प्रमुख मसूद अझहरचा मेहुणा युसूफ अझहरही ठार झाला आहे. युसूफ अझहर हा केवळ मसूदचा मेहुणाच नव्हे, तर अतिशय कुख्यात दहशतवादी म्हणून ओळखला जात असे आणि भारतासाठी तो मोस्ट वाँटेड होता. कंदाहार विमान अपहरणात तोही सहभागी होता. बालाकोटमधील ज्या तळावर हवाई दलाच्या विमानांनी हल्ला चढवला, तिथे तरुणांना दहशतवादी प्रशिक्षण देण्याची जबाबदारी युसूफ अझहर याच्यावर होती. इंडियन एअरलाइन्सच्या काठमांडूहून दिल्लीकडे येणाऱ्या विमानाचे २४ डिसेंबर १९९९ रोजी अपहरण करण्यात आले होते. ते विमान अपहरणकर्त्यांनी अमृतसर, लाहोर, दुबई व नंतर अफगाणिस्तानातील कंदाहार येथे नेले. हे विमान व आतील प्रवासी सात दिवस अपहरणकर्त्यांच्या ताब्यात होते.
एकूण १७६ पैकी २६ प्रवाशांना अपहरणकर्त्यांनी दुबई येथे सोडून दिले. एकाला त्यांनी भोसकले आणि अन्य काही जणांनाही मारहाण केली. या अपहरणात युसूफ अझहर सहभागी होता. त्यावेळी मसूद अझहर व अन्य दोन पाकिस्तानी दहशतवादी भारतीय तुरुंगात खितपत पडले होते. त्यांना सोडून द्यावे, अशी अपहरणकर्त्यांची मागणी होती. अखेर भारताने मसूद अझहर तसेच मुश्ताक अहमद झरगार व अहमद ओमर सईद शेख यांना सोडण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे, तर भारताचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह त्या तिघांना घेऊन विमानाने कंदाहारला गेले होते. त्या तिघांचा ताबा दिल्यानंतरच अपहरणकर्त्यांनी विमानाचा ३१ डिसेंबर १९९९ रोजी ताबा सोडला. त्याआधी अपहरणकर्त्या दहशतवाद्यांशी वाटाघाटी करीत होते अजित डोवाल. तेव्हा ते इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख होते.
सध्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. तेव्हापासून मसूद अझहरच्या कारवाया वाढल्या. त्याच्या सर्व कृत्यात त्याचा मेहुणा युसूफ अझहरही सहभागी असे. हवाई दलाने केलेल्या कारवाईच्या आधीच पाकिस्तानने मसूद अझहरला तेथून हलवले होते. तो सध्या बहावलपूर येथे असल्याचे सांगण्यात येते. तो नाही, तरी त्याचा मेहुणा युसूफ मात्र ठार झाला आहे.