श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुलवामा परिसरात गेल्या एक दोन दिवसांपासून दहशतवाद्यांनी थैमान घातले असून, आज संध्याकाळी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला घडवून आणला. दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये पोलीस ठाण्याला लक्ष्य करून केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात पाच नागरिक जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी पुलवामा येथे एका पोलीस ठाण्याला लक्ष्य करून ग्रेनेड फेकले होते. मात्र निशाणा चुकून हे ग्रेनेड पोलीस ठाण्याबाहेरच्या आवारात फुटले. त्यामुळे झालेल्या स्फोटात पाच जण जखमी झाले. दरम्यान, सोमवारी पुलवामाजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात दोन जवान शहीद झाले होते, तर दोन स्थानिक नागरिक गंभीर जखमी झाले होते. लष्कराच्या पेट्रोलिंग करणाऱ्या 44 आरआर या मोबाईल व्हॅनला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला होता. अनंतनाग परिसरात मंगळवारी सकाळपासून भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत लष्कराने सज्जाद भट या दहशतवाद्याला ठार केले. सज्जाद हा पुलवामा हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांमधील एक आणि जैशचा कमांडर होता. त्याच्यासोबत आणखी एका दहशतवाद्याला ठार मारण्यात आले आहे.