सुरेश एस. डुग्गर
जम्मू : गेल्या दोन वर्षांपासून जम्मू भागामध्ये दहशतवादी अचानक हल्ले करत असून, गनिमी काव्याने आपल्या घातपाती कारवाया करीत आहेत. त्यांनी बदललेल्या या रणनीतीचा मुकाबला करताना लष्कराचे ५२ जवान शहीद झाले. पाकिस्तानातील माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली हे दहशतवादी सीमेपलीकडून भारतात घुसखोरी करून हिंसाचार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
जम्मूतील सर्व जिल्ह्यांमध्ये घातपाती कारवाया करण्यासाठी सीमेपलीकडून दहशतवादी आले असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांची संख्या किती हे भारतीय गुप्तचर यंत्रणांना अद्याप कळू शकलेले नाही, असे सांगण्यात आले. कठुआ, राजौरी, पुंछ, दोडा, भद्रवाह, उधमपूर, किश्तवाड येथे गेल्या दोन वर्षांत दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर अचानक हल्ले केले आहेत. त्यावेळी दहशतवादी अमेरिकी बनावटीच्या एम-४ कार्बाइनचा वापर करतात.
जम्मूतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक
जम्मूतील सर्व जिल्ह्यांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केल्याचे लक्षात आल्यानंतर भारतीय लष्कराने तिथे अनेक ठिकाणी छावण्या स्थापन केल्या आहेत. जे दहशतवादी अद्याप पकडले गेलेले नाहीत त्यांचाच राजौरी, पुंछ, दोडा येथील हल्ल्यांमागे हात असल्याचा दावा लष्करी अधिकाऱ्यांनी केला आहे. या दहशतवाद्यांचाही लवकरच समूळ नायनाट करू, असे लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
शोध सुरूच
राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ बुधवारी रात्री संशयास्पद हालचाली आढळल्याने त्या दिशेने सुरक्षा जवानांनी गोळीबार केला.
गुरुवारी सकाळी या भागात शोध घेतला असता जवानांना तिथे संशयास्पद असे काही आढळून आले नाही. दोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम उघडण्यात आली आहे.
खबरे बोलेनात...
या भागात लष्कराचे खबरे होते त्यांच्याकडे काही प्रमाणात लष्कराचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या खबऱ्यांकडून मिळणारी गोपनीय माहितीही आटली आहे.
nत्याचा फटका बसत आहे, असे मतही व्यक्त होत आहे. ड्रोनपेक्षा मानवी टेहळणी अधिक महत्त्वाची आहे, असे अधिकाऱ्यांना वाटते.