Smriti Irani on Congress : जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम 370 च्या मुद्द्यावरुन झालेला गोंधळ आणि फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या पत्नीने राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रावरुन भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. "जम्मू-काश्मीर विधानसभेत संविधानाचा गळा घोटण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स देश तोडण्याचे काम करत आहेत," अशी घणाघाती टीका स्मृती इराणी यांनी केली. तसेच, यासिन मलिकच्या पत्नीच्या पत्रावरुन त्यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला आहे.
स्मृती इराणी म्हणतात, "दहशतवादी मार्गावर चालणारे गांधी कुटुंबाची मदत घेत आहेत. ज्याने काश्मीरमध्ये दहशत निर्माण करुन निष्पाप लोकांचे प्राण घेतले, तो आज गांधी कुटुंबासमोर मदतीचा हात पुढे करत आहे. आज या खोलीत बसलेल्या कोणत्याही व्यक्तीला दहशतवादी पाठिंबा मागू शकतो का? मग असे काय झाले की, दहशतवादाचे समर्थन करणारे गांधी घराण्याची मदत मागत आहेत?"
संविधानाचा गळा घोटला गेला "भारतीय संसद आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना मान्य आहे. त्या निर्णयाचा अवमान करण्याचा अधिकार कोणी दिला? इंडिया आघाडीने जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय संविधानाचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला. कलम 370 पुनर्स्थापित करण्याचा प्रस्ताव मंजूर करून आदिवासी, दलित आणि महिलांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. इंडिया आघाडीचे लोक भारतीय राज्यघटनेच्या विरोधात नवे युद्ध पुकारताना दिसत आहेत," अशी टीकाही इराणी यांनी केली.
त्या पुढे म्हणतात, "संसदेच्या अधिकारांना आव्हान देण्याचा अधिकार काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला कोणी दिला? कलम 370 रद्द केल्यानंतर दलित आणि आदिवासींना दिलेले अधिकार काँग्रेसला का रद्द करायचे आहेत? कलम 370 हटवल्यानंतर दहशतवादी हल्ल्यांमध्ये 70 टक्के घट झाली आहे. नवीन सरकारने जनतेच्या विकासासाठी काम केले पाहिजे पण त्याऐवजी ते भलत्याच कामात गुंतले आहेत. राज्यातील नवे सरकार भारताला एकत्र करण्याऐवजी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. कलम 370 परत आणण्याचे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत."
यासीनच्या पत्नीचे राहुल गांधींना पत्रजम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट या फुटीरतावादी संघटनेचा नेता यासिन मलिकची पत्नी मुशाल हुसैन मलिकने राहुल गांधींना पत्र लिहून पतीला न्याय देण्याची मागणी केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात यासिन महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे मुशालने या पत्रात म्हटले आहे. मुशालने राहुल गांधींना हे प्रकरण संसदेत मांडण्याचे आवाहन केले आहे. यासीन मलिक देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असून, 2022 मध्येच न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."