बंगळुरु, दि. 6 - केरळमध्ये आरएसएस कार्यकर्ता राजेश याची गेल्या आठवड्यात तीक्ष्ण हत्यारानं वार करून हत्या करण्यात आली. त्याच्या अंगावरील जखमा पाहिल्यावर दहशतवाद्यांनाही लाज वाटली असती असे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं. अरूण जेटली यांनी आज राजेशच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केलं. केरळमध्ये संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या आणि त्यांच्यावर होणारे हल्ले पूर्वनियोजित आहेत असा आरोपही जेटली यांनी यावेळी केला.पुढे बोलताना जेटली यांनी केरळ सरकारच्या भूमिकेवर केंद्र सरकार नाराज असल्याचे सांगितले. हिंसेच्या काळात लोकांचं आणि अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान होतं. लोकशाहीचंही नुकसान होतं. केरळमध्ये भविष्यात अशा प्रकारच्या हिंसक घटना घडू नये, राज्यात शांतता निर्माण व्हावी हीच आशा असल्याचे ते म्हणाले. वाढत्या हिंसाचाराच्या घटनांवर पोलिसांनी लक्ष द्यावं आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशीही मागणी जेटली यांनी केली आहे.आरएसएसच्या स्वयंसेवकांच्या घरावर हल्ले झाले आहे, त्यामुळे राज्यसरकारने दोषींवर कारवाई करण्याची मागणी अरूण जेटली यांनी केली. इतकंच नाही तर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसोबत आहोत आणि इथली परिस्थिती कशी नियंत्रणात आणायची यावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत, असंही जेटली यांनी म्हटलं आहे. भाजपशासित राज्यांमध्ये हा हिंसाचार झाला असता तर पुरस्कार परत करण्यात आले असते, संसदेचं कामकाज रोखलं गेलं असतं, मोहिमा राबविल्या गेल्या असत्या असेही ते म्हणाले.
आरएसएस कार्यकर्त्याच्या जखमा पाहून दहशतवादीही लाजले असते - जेटली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2017 5:42 PM