नवी दिल्ली : दिल्लीच्या राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील सिंहांसह अन्य काही प्राण्यांच्या रक्ताचे नमुने कोरोना चाचणीसाठी उत्तर प्रदेशमधील बरेली येथील इंडियन व्हेटेरिनरी रिसर्च इन्स्टिट्यूट (आयव्हीआरआय)मध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचे अहवाल लवकरच हाती येतील. (testing of Lions at the zoo and other animals, IVRI will report soon)या प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे का? हे तपासण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले आहे. राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे संचालक रमेश पांडे यांनी सांगितले की, या प्राणिसंग्रहालयातील एकाही प्राण्याला कोरोनाची लागण झाल्याचे अद्याप निदर्शनास आलेले नाही किंवा तसा अहवाल मिळालेला नाही. देशातील विविध प्राणिसंग्रहालयांमध्ये प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. कोरोनाची साथ सुरू झाली तेव्हापासूनच दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयातही नियमितपणे सॅनिटायझेशन करण्यातयेते. देशात याआधी उत्तर प्रदेशमधील इटावा सफारी पार्कमधील दोन सिंहिणींना कोरोनाची बाधा झाली होती. त्याशिवाय हैदराबादमधील नेहरु झुऑलॉजिकल पार्कमधील चार सिंह व चार सिंहिणींना कोरोनाची लागण झाली होती. प्राण्यांना कोरोना संसर्ग होण्याचा प्रकार देशात प्रथम हैदराबाद येथेच घडला होता. प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांकडून हा विषाणू प्राण्यांमध्ये संक्रमित झाल्याचे सांगण्यात येते.
अमेरिकेत कुत्रा, मांजरांनाही कोरोनाची लागण- अमेरिकेत कुत्री, मांजरी यांच्यासह अन्य काही प्राणी कोरोनाबाधित झाल्याची उदाहरणे गेल्या काही महिन्यांत समोर आली आहेत.- स्लोवेनिया येथे फेरिट या प्राण्याला कोरोनाची लागण झाली होती. कोरोना विषाणूचे प्राण्यांत अस्तित्व असण्याबद्दल काही देशांत सध्या संशोधन सुरू आहे.
केंद्रीय वन्य व पर्यावरण खात्याने सांगितले की, दिल्लीतील प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची प्रकृती उत्तम आहे. कोरोना विषाणूचा प्राण्यांमार्फत प्रसार होत नाही, असे एका पाहणीत आढळून आले आहे.