लखनऊ : महाराष्ट्रात आरोग्य विभागाच्या भरतीच्या परीक्षेचा गोंधळ मिटण्याचे नाव घेत नसताना उत्तर प्रदेशमध्ये पेपर वाटल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. उत्तर प्रदेशशिक्षक पात्रता परीक्षा 2021 चा पेपर काही मिनिटे आधी फुटला. यामुळे परीक्षा रद्द झाल्याने लाखो परीक्षार्थींना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. या परीक्षेला 21 लाख परीक्षार्थी बसणार होते.
रविवारी अनेक परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींच्या हातात पेपर पडला होता. नाव, नंबर आदी भरण्यास सुरुवात झाली होती. त्याच्या काही मिनिटांतच पेपर लीक झाल्याचा मेसेज येऊन धडकला आणि परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींकडून पेपर काढून घेण्यात आला. या प्रकरणी यूपी एसटीएफने डझनभर लोकांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
UP TET चा पेपर रविवारी होता. परीक्षा दोन टप्प्यांत होणार होती. पहिल्या टप्प्यात प्राथमिक स्तरासाठी शिक्षक पात्रता परीक्षा होणार होती. यासाठी 2,554 परीक्षा केंद्र बनविण्यात आले होते. यावर 12,91,628 परीक्षार्थी पेपर सोडविणार होते. दुसऱ्या टप्प्यात उच्च प्राथमिक स्तरासाठी शिक्षक पात्रता परीक्षा होणार होती. यासाठी 1,747 परीक्षा केंद्र बनविण्यात आले होते. या परीक्षेसाठी 8,73,553 परीक्षार्थी बसणार होते. पहिल्यांदाच परीक्षार्थिंवर नजर ठेवण्यासाठी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. परीक्षेच्या काही मिनिटे आधीच व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर पेपर लीक झाला. आता उत्तर प्रदेश सरकार महिनाभराच्या आत पुन्हा परीक्षा घेणार आहे.
परीक्षेचा पेपर मथुरा, गाझियाबाद, बुलंदशहर आदी ठिकाणांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाला. यामुळे तातडीने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मेरठ येथून तीन व अन्य काही ठिकाणांहून असे डझनभर लोक ताब्यात घेण्यात आले आहेत.