नवी दिल्ली : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी संसद भवनात काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर सावरकर यांच्यावर टीका करण्याच्या मुद्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटामधील तणाव आणि वाद संपुष्टात आला आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी राऊत यांची अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील देण्यास राऊत यांनी नकार दिला. पण, भेटीनंतर सर्वकाही आलबेल असल्याचे ट्वीट केले.
सावरकरांबद्दलच्या राहुल गांधींच्या विधानावर वाद निर्माण झाला होता. सावरकरांविषयीच्या महाराष्ट्राच्या भावना अवगत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी समजावून सांगितल्यानंतर वाद संपला होता. हा वाद निवळल्यानंतर संजय राऊत व राहुल गांधी यांचे बुधवारी भेटण्याचे ठरले. संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या या बैठकीला सोनिया गांधीही होत्या. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट झाली. अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. सर्व काही आलबेल आहे. चिंता नसावी, असे ट्वीट संजय राऊत यांनी अर्धा तास चाललेल्या या बैठकीनंतर केले आहे.
आमच्या श्रद्धा आहेत तशाच
सावरकरांवरील टीकेचा मुद्दा मविआच्या सोयीचा नाही. त्यांच्याविषयी आमच्या श्रद्धा आहेत तशाच राहतील. आमच्यासाठी ते आदर्श आणि वीरपुरुष आहेत. भाजपला सावरकरांवर अकारण प्रेमाचे ढोंग करण्याचे एक हत्यार मिळाले आहे ते थांबवले पाहिजे, अशी भूमिका आपण मांडली, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
खासदारकी गेल्यानंतर राहुल प्रथमच संसदेत
राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना बुधवारी भेटण्यासाठी फोन केला तेव्हा राऊत संसद भवनात होते. सूरत न्यायालयाच्या निकालामुळे खासदारकी गमावल्यानंतर राहुल गांधी राऊत यांना भेटण्यासाठी प्रथमच संसद भवनात पोहोचले. पण तोपर्यंत राऊत आपल्या निवासस्थानी परतले होते. राहुल गांधी संसदेत पोहोचून प्रतीक्षा करीत असल्याचे के. सी. वेणुगोपाल यांनी कळविल्यानंतर राऊत पुन्हा संसद भवनात परतले. राहुल गांधींसोबत त्यांची अनपेक्षितपणे सोनिया गांधींशीही भेट झाली.