Thackeray Group MP Priyanka Chaturvedi Slams Bjp:काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या ओडिशा आणि झारखंड येथे असलेल्या बेहिशेबी मालमत्तेवर प्राप्तीकर विभागाने छापे टाकले. चार दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी बेहिशोबी रोख रकमेची मोजणी सुरू आहे. ही रक्कम ३०० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याचे प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. बुधवारपासून प्राप्तीकर विभागाने कारवाई सुरू केली होती. एकाच धाडीत एवढ्या मोठ्या प्रमाणात काळा पैसा प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, यावरून भाजपने काँग्रेसवर सडकून टीका केली असून, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदाराने भाजपला खोचक टोला लगावला आहे.
ओडिशामधील बोध डिस्टलरी प्रा. लि. या कंपनीच्या कार्यालयात सर्वाधिक रोकड आढळली आहे. प्राप्तीकर विभागाने जप्त केलेल्या रोख रकमेची अद्यापही मोजणी सुरूच आहे. नोटा मोजण्यासाठी आम्ही ४० मोठ्या आणि काही छोट्या मशीन तैनात केल्या आहेत. जेणेकरून ही कारवाई लवकर पूर्ण केली जाईल. आम्ही बोलंगीर आणि संबलपूर जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला विनंती केली आहे की, त्यांनी बँकेतील कर्मचारी नोटांजी मोजणी करण्याच्या कामासाठी द्यावेत, अशी माहिती प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर आता ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
धीरज साहू पक्षात आले तर क्लीन चिट देणार नाही, हे भाजप नेत्यांनी सांगावे
एवढ्या प्रचंड प्रमाणात रोख स्वरुपात रक्कम बाळगणे आणि करचोरी करणे ही चुकीची गोष्ट आहे. करचोरीचे प्रकरण तर गुन्हेगारी स्वरुपाचे मानले जाते. धीरज साहू यांच्यावर भाजपचे नेते, मंत्री मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत. आगामी काळात धीरज साहू भारतीय जनता पक्षात आले तर या सर्व प्रकरणात त्यांना क्लीन चिट दिली जाणार नाही, असे आश्वासन भाजप नेत्यांनी तसेच मंत्र्यांनी द्यावे, असा खोचक टोला प्रियांका चतुर्वेदी यांनी लगावला. तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, याचे कारण म्हणजे, महाराष्ट्रात ७० हजार कोटींचा घोटाळा झाला, परंतु, ते भाजपसोबत गेले आणि सगळे जण हा घोटाळा विसरले. आमचा पक्ष सोडून भाजपमध्ये किंवा भाजपसोबत गेलेल्या नेत्यांवरील ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयची कारवाई थांबते. काँग्रेसवर भ्रष्टाचारी पक्ष अशी टीका करण्यापेक्षा असा भ्रष्टाचार करणारे भाजपमध्ये आल्यावर गंगास्नान करून शुद्ध होणार नाहीत, हे आश्वासन द्यावे, अशी टीका प्रियांका चतुर्वेदी यांनी केली.
दरम्यान, काँग्रेसने खासदार धीरज साहू यांच्या कारवाईनंतर हात झटकले आहेत. तर, हा नवा भारत आहे. येथे राजघराण्याच्या नावावर जनतेचे शोषण करू दिले जाणार नाही. तुम्ही पळून थकाल, पण कायदा तुमचा पिच्छा सोडणार नाही. काँग्रेस जर भ्रष्टाचाराची गॅरंटी असेल तर पंतप्रधान मोदी हे ‘भ्रष्टाचारावर कारवाईची गॅरंटी’ आहेत. जनतेकडून लुटलेला पै-पै परत करावा लागेल, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली आहे.