Thackeray Group MP Rajabhau Waje On Union Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये विद्यार्थी वर्ग, तरुण, शेतकरी, महिला, स्टार्टअप यांसाठी अनेकविध योजना घोषित केल्या. तसेच काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. कररचनेत बदल करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पावरून आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर टीका करण्यात येत आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काही मिळाले नाही. याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत दिसेल, असा मोठा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
या अर्थसंकल्पात ९ घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यात शेती क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी विकास, उर्जा संरक्षण, पायाभूत संरचना, संशोधन व विकास, नव्या पीढीतील सुधारणा आदींचा समावेश आहे. आंध्र प्रदेश आणि बिहारसाठी करण्यात आलेल्या घोषणांवरून विरोधकांनी केंद्रातील एनडीए सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच महाराष्ट्रालाही काही मिळाले नसल्यावरून महाविकास आघाडीने राज्यातील महायुती सरकार तसेच भाजपावर टीका केली आहे.
बजेटमधून महाराष्ट्राला काहीच नाही, याचा फटका विधानसभेत बसलेला दिसेल
नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना मोठा दावा केला आहे. अर्थसंकल्प पाहिला तर महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही, असे म्हणायला वाव आहे. शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नाही. आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यांना जास्त फायदा झालेला दिसत आहे. एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा आधी होता, त्यामुळे त्यांना काहीच दिले नाही असे वाटते. ज्यांच्यामुळे सरकार आहे, त्यांना जास्त लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राला सर्वच बाबतीत अपेक्षा होत्या. याचा परिणाम पुढील विधानसभा निवडणुकीत दिसेल, असा इशारा राजाभाऊ वाजे यांनी दिला.
दरम्यान, मला वाटते की, या अर्थसंकल्पाला 'पंतप्रधान सरकार बचाव योजना' म्हणायला हवे. कारण त्यांना हे लक्षात आले आहे की, पुढील ५ वर्षांसाठी हे सरकार वाचवायचे असेल तर त्यांच्या मित्रपक्षांना आनंदी ठेवण्याची गरज आहे. बिहार आणि आंध्र प्रदेशला विशेष दर्जा नाकारल्यानंतर केंद्र सरकारने त्यांना निधी दिला. केंद्राकडून महाराष्ट्राकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्रातून पैसा हवा आहे. परंतु, महाराष्ट्रातील विकास, योजना यांसाठी काही नाही. महाराष्ट्रातील महायुती एनडीएचा घटक पक्ष आहे. परंतु, महाराष्ट्राच्या गरजा, मागण्या याबाबत सरकार अवाक्षर काढत नाही. ही शरमेची गोष्ट आहे, अशी टीका ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली.