लखनौ - ट्रॅफिक पोलिसांकडून वाहनचालकांना नेहमीच त्रास देण्यात येतो किंवा पैसे उकळण्यासाठी अनेकदा गरज नसलेल्या कागदपत्रांचीही मागणी केली जाते, असा आरोप करण्यात येतो. त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांबद्दल सर्वसामान्यांच्या मनात रागही असतो. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका महिला ट्रॅफिक पोलिसाचा पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र, आता उत्तर प्रदेशातील एकदिवसीय महिला पोलिसाने चक्क स्वत:च्या वडिलांना दंड ठोठावला आहे.
पोलीस खात्यातील कर्तव्यनिष्ठेचं उदाहरणच बीएससीची विद्यार्थीनी आकांक्षाने सर्वांसमोर ठेवलंय. आकांक्षा हिने वाहन तपासणीदरम्यान विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या स्वत:च्या वडिलांचीच पावती फाडली आहे. तसेच, शहरातील बाजारात दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून आलेल्या तक्रारदारांच्या तक्रारीचीही तत्काळ दखल घेतली. बालिका दिवसच्या निमित्ताने ऊसराहार पोलीस ठाण्यात प्रभारी म्हणून आकांक्षा गुप्ता या विद्यार्थीनीला संधी देण्यात आली होती. त्यावेळी, पोलीस ठाण्याचे निरीक्षण केल्यानंतर आकांक्षाने सर्वांचा परिचय करुन घेतला. त्यानंतर, पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी आलेल्या भोले सक्सेना यांची विचारपूस करुन त्यांच्या तक्रारीसंदर्भात उप निरीक्षक धर्मेंद्र शर्मा यांनी चौकशीचे आदेश दिले.
पोलीस ठाण्याचे प्रमुख प्रभारी अमरपाल सिंह आणि पोलीस सहकाऱ्यांसोबत गावात परेडही केली. यावेळी, दुचाकीवरुन विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या वडिल अरविंद गुप्ता यांनाही आकांक्षाने अडवले. त्यांच्याकडून दंड वसुल करुन त्यांना पावतीही दिली. तसेच, कुटुंबाच्या सुरक्षेसाठी यापुढे हेल्मेट घालूनच प्रवास करण्याची सूचना केली. त्यावेळी, वडिल अरविंद गुप्ता यांनीही मुलीचा सल्ला कटाक्षाने पाळणार असल्याचं आश्वासन दिलं.
एकदिवसीय पोलीस ठाणे प्रभारी बनविल्याने आकांक्षाने आनंद व्यक्त केला, तसेच पोलिसांच्या कामकाजाला जवळून अनुभवता आल्याचे सांगितले. तसेच, तक्रारींची नोंद घेऊन लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्याचे आदेशही दिल्याचे आकांक्षाने सांगितले.