लोकमत न्यूज नेटवर्कठाणे/मुंबई : बारावीच्या आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला. ठाण्यातील सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील मानव्यविद्या शाखेचा विद्यार्थी रेहान सिंग भारतातून पहिला आला आहे. त्याला ९९.७५ टक्के (३९९/४००) गुण मिळाले आहेत.
रेहान हा पोखरण रोड क्रमांक २ येथे राहतो. मी कला शाखेत शिकत असून या शाखेत पदवी घेणार आहे. त्याचबरोबर, यूपीएससीची तयारी करणार आहे. इंग्लिश, पॉलिटिकल सायन्स आणि सायकॉलॉजी या तीन विषयांत १०० पैकी १०० गुण प्राप्त झाले आहे. या यशाचे श्रेय शिक्षक, पालक, मित्रांचे असल्याचे रेहानने सांगितले.
विद्यार्थ्यांमधील गुणांच्या स्पर्धेला फाटा देत टॉपर्सची नावे टाळून कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता घेतलेल्या दहावी-बारावी परीक्षांचा निकाल सोमवारी जाहीर केला. दहावीचा ९९.४७ टक्के तर, बारावी परीक्षेचा निकाल ९८.१९ टक्के लागला आहे.देशभरातून परीक्षा देणाऱ्या २,४३,६१७ पैकी २,४२,३२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात १,१३,१११ विद्यार्थिनींचा समावेश असून १,१२,७१६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. हे प्रमाण ९९.६५ टक्के, तर १,३०,५०६ मुलांपैकी १,२९,६१२ मुले उत्तीर्ण झाली आहेत. हे प्रमाण ९९.३१ टक्के इतके आहे. मुलींची कामगिरी मुलांच्या तुलनेत चांगली राहिली.
भारतीय परराष्ट्र सेवेत भरती होण्याची इच्छारेहान म्हणाला की, माझे आई-वडील, आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे यश प्राप्त झाले आहे. मला साहित्य, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि इतिहास वाचायला नेहमीच आवडते. मला कविता आणि इतरही गोष्टींवर लिहायला आवडते. यूपीएससीच्या माध्यमातून भारतीय परराष्ट्र सेवेद्वारे देशाची सेवा करणे हेच स्वप्न आणि ध्येय आहे.
महाराष्ट्राची कामगिरीमहाराष्ट्रातून २८,५८८ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी ९९.९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर बारावीची परीक्षा ३,८४० विद्यार्थ्यांनी दिली. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.७१ टक्के इतके आहे.
सुधारण्याची संधीविद्यार्थ्यांना गुणांविषयी शंका असल्यास पेपर रिचेकिंग आणि रिव्हॅल्युएशनसाठी अर्ज करता येईल. त्याकरिता एक ते दीड हजार रुपये शुल्क आकारले जाईल. विद्यार्थ्यांना कमीत कमी दोन विषयांना पुन्हा बसून आपला निकाल सुधारता येईल. या परीक्षांचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल.दहावीची परीक्षा दिलेल्या अनुसूचित जातीच्या (एससी) १५,०२५ विद्यार्थ्यांपैकी ९९.११ टक्के उत्तीर्ण झाले आहेत. तसेच बारावीची परीक्षा दिलेल्या अनुसूचित जातीच्या (एससी) ५,१९४ विद्यार्थ्यांपैकी ९७.७१ टक्के उत्तीर्ण झाले आहेत. अनुसूचित जमातीच्या (एसटी) ३,६०० विद्यार्थ्यांपैकी ९६.९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.