ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासीत यांनी बुधवारी अभिनेते अनुपम खेर यांना फोन करुन कराची लिटरेचर फेस्टिव्हलसाठी व्हिसा देण्याची तयारी दाखवली. मात्र अनुपम यांनी आपण तारखा दुस-या कार्यक्रमांसाठी दिल्याचे सांगत व्हिसासाठी अर्ज करण्यास नकार दिला.
पाच ते सात फेब्रुवारी दरम्यान होणा-या कराची लिटरेचर फेस्टिव्हलसाठी मंगळवारी पाकिस्तानने भारतातील १८ पैकी १७ अर्ज मंजूर केले पण एकटया अनुपम खेर यांना व्हिसा नाकारला होता. व्हिसा नाकारण्यावर खेर यांनी नाराजी प्रगट केली होती.
व्हिसा नाकारल्यामुळे मी निराश आणि दु:खी झालो आहे. मी सातत्याने काश्मिरी पंडितांचा मुद्दा उपस्थित करीत आलो असून, देशभक्त या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समर्थक राहिलो असल्यानेच मला व्हिसा नाकारण्यात आला नाही ना, असा सवाल खेर यांनी केला होता.
Thank you Mr. @abasitpak1 for your call & offering me visa to visit Karachi. I appreciate it. Unfortunately i've given away those dates now.— Anupam Kher (@AnupamPkher) February 3, 2016
अनुपम खेर यांनी बुधवारी व्हिसासाठी अर्ज केला तर, काही तासात त्यांचा व्हिसा मंजूर करु असे पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिका-यांनी मंगळवारी रात्री सांगितले होते.