मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींना अचानक लेह दौरा करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. मोदींनी लेह लडाख सीमारेषेवरु जाऊन देशातील जवानांचे मनोबल वाढविण्याचं काम केलंय. मोदींनी सीमारेषेवरील तैनात जवानांना संबोधित करताना, आपलं शौर्य हिमालयाच्या उंचीपेक्षाही मोठं असल्याचं म्हटलंय. एकीकडे नरेंद्र मोदींचा दौरा देशात चर्चेत विषय बनलाय, तर दुसरीकडे अभिनेता आणि भाजपा नेते परेश रावल यांचे एक ट्विटही चर्चेचा विषय बनले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लडाख सीमारेषेवर जाऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मोदींच्या लेह भेटीचे फोटो काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर, ट्विटरवरही मोदींच्या या भेटीनंतर लडाख नावाने काही ट्रेंड सुरु झाले आहेत. मोदींनी लेह येथील भारतीय सैन्यांना संबोधित करताना त्यांच्या पराक्रमाचा देशाला अभिमान असल्याचे म्हटले. जगभराने आपलं शौर्य पाहिलं असून घराघरात आपल्या शौर्याच्या कथा सांगितल्या जात आहेत. देशाला आपला अभिमान असून आपल्या पराक्रमाची गाथा सर्वत्र गायिली जात आहे.
मोदींचे लेहमधील भाषणही चर्चेचा विषय बनले असून या भाषणाचेही सोशल मीडियावर कौतुक होत आहे. दुसरीकडे काँग्रेस नेत्यांकडून भाजपा आणि मोदींच्या या दौऱ्याला लक्ष्य केलं जात आहे. अभिनेता परेश रावल यांनी एका वाक्यात मोदींच्या लेह दौऱ्याचं कौतुक केलंय. नरेंद्र मोदी दिल्याबद्दल देवा तुझे आभार, असे ट्विट परेश रावल यांनी केले आहे. रावल यांच्या ट्विटवर अनेक कमेंट पडल्या आहेत. त्यामध्ये अनेकांनी त्यांना ट्रोल करत, त्यांच्यावर टीका केली आहे. तसेच, अनेकांनी रावल यांच्या ट्विटचे समर्थनही केले आहे.
दरम्यान, लडाख सीमारेषेवरील भारतीय भूमीवर चीनने अतिक्रमण केल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात भारतीय सैन्यावर चीनने पाठीमागून हल्ला केला. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले तर चीनचे 40 हून अधिक जवान मारले गेले. यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणावाची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज थेट लेह गाठत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. यावेळी, मोदींनी सैन्याला संबोधित करत, त्यांना धीर देत देशाची 130 कोटी जनता आपल्यासोबत असल्याचे म्हटलं आहे. आत्मनिर्भर भारताचा संकल्प आपल्या त्याग आणि बलिदानातूनच मजबूत होणार असल्याचे मोदींनी म्हटले.