नवी दिल्ली : माझे नाहीतर आमदारांची खरेदी करून तुमचे सरकार स्थापन करण्यास मदत केल्याबद्दल तुम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानायला हवेत, असा टोला काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना शनिवारी लगावला. सिंह गोव्यात भ्रमंती करीत होते आणि मी सरकार स्थापन करण्यात यशस्वी झालो. त्यामुळे मी त्यांचे आभार मानू इच्छितो, असे पर्रीकर यांनी शुक्रवारी म्हटले होते. त्याला सिंह यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. सिंह काँग्रेसचे गोवा प्रभारी आहेत. सत्तेसाठी हावरटपणा केल्याबद्दल तुम्हाला लाज वाटायला हवी. तुम्ही गोव्यातील जनतेला धोका दिला आहे. तुम्ही जनतेची माफी मागितली पाहिजे, असेही सिंह म्हणाले. ‘पर्रीकर यांनी गोव्यात त्यांचे सरकार स्थापन करू दिल्याबद्दल माझे आभार मानले आहेत. खरेतर त्यांनी गडकरी यांचे आभार मानायला हवेत. कारण, गडकरींनीच गोव्यातील एका हॉटेलमध्ये १२ मार्च रोजी आक्रमकपणे आमदारांची खरेदी केली, असे सिंह म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आमदार खरेदीबद्दल गडकरींचे आभार माना
By admin | Published: April 02, 2017 1:00 AM