राहुल गांधींमुळेच माझा मुलगा वैमानिक झाला, निर्भयाच्या आईने मानले आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 12:45 AM2017-11-03T00:45:41+5:302017-11-03T00:45:53+5:30
२0१२ साली झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतर अनेक मोर्चे निघाले, आंदोलने झाली, पुढे त्या मुलीवर बलात्कार करून, तिची हत्या करणा-यांना शिक्षाही झाली. या सर्व काळात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी त्या कुटुंबाच्या सतत संपर्कात होते.
नवी दिल्ली : २0१२ साली झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतर अनेक मोर्चे निघाले, आंदोलने झाली, पुढे त्या मुलीवर बलात्कार करून, तिची हत्या करणा-यांना शिक्षाही झाली. या सर्व काळात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी त्या कुटुंबाच्या सतत संपर्कात होते. त्यांच्या मदतीनेच निर्भयाचा भाऊ आज वैमानिक झाला आहे. निर्भयाच्या आईनेच ही माहिती देताना राहुल यांचे आभार मानले.
राहुल गांधींमुळेच माझा मुलगा वैमानिक झाला, असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. निर्भया प्रकरणामुळे आम्ही पार कोलमडून गेलो होतो. अनेक जणांनी सांत्वन केले, मदतीचा हात पुढे केला. त्यात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वड्रा याही होत्या. त्या नियमितपणे आमच्या संपर्कात होत्या, असे आईने सांगितले आहे. राहुल यांनीच आपल्या मुलाला वैमानिक होण्याचा सल्ला दिला. एवढेच नव्हेतर, त्याच्या शिक्षणाचा सारा खर्चही त्यांनीच केला. ते नियमितपणे त्यांच्या संपर्कात होते. ते त्याला प्रोत्साहन देत राहिले. खटल्याच्या बातम्यांमुळे त्याचे मन विचलित होत असे. अशा काळात त्याला सावरण्याचे कामही त्यांनी केले, असे आईने सांगितले.
- मुलाला लष्करात जाण्याची इच्छा आहे, हे कळताच राहुल गांधी यांनी त्याला वैमानिक होण्याचा सल्ला दिला. तो बारावी झाल्यानंतर रायबरेली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय विमान उड्डाण अॅकेडमीमध्ये त्याला प्रवेश मिळावा, यासाठी साह्य केले. प्रशिक्षणाचा सारा खर्चही राहुल यांनीच केला, असे निर्भयाच्या आईने म्हटले आहे.
- सध्या निर्भयाचा भाऊ गुरगावमध्ये पुढील प्रशिक्षण घेत आहे. त्यानंतर तो प्रत्यक्ष विमानाचे उड्डाण करू शकेल, अशी माहितीही त्याच्या आईने दिली आहे.