नवी दिल्ली- सुनंदा पुष्कर प्रकरणात दिल्लीतल्या पटियाळा हाऊस कोर्टानं शशी थरूर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. परंतु न्यायालयानं त्यांना देशाबाहेर जाण्यापासून घातलेल्या बंदीवर भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी टीका केली आहे. शशी थरूर तिहार जेलमध्ये नाहीत, ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत बसू शकतात. खरं तर तेसुद्धा "बेलवाले"च आहेत. परंतु आता शशी थरूर यांना परदेशात जाऊन वेगवेगळ्या गर्लफ्रेंड्सना भेटता येणार नाही, असं म्हणत सुब्रमण्यम स्वामींनी शशी थरूर यांच्यावर व्यक्तिगत हल्लाबोल केला आहे.सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात न्यायालयानं काँग्रेस नेते शशी थरूर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. थरूर यांना 1 लाख रुपयांच्या बेल बाँडवर हा जामीन देण्यात आला आहे. परंतु शशी थरूर न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेरही जाऊ शकत नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश अरविंद कुमार यांनी दोन्ही बाजूंकडचा युक्तिवाद ऐकला आणि निर्णय राखून ठेवला होता. अखेर त्यावर आज सुनावणी झाली. थरूर यांच्याकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, शशी थरूर एक खासदार आहेत आणि या प्रकरणात त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळायलाच हवा. थरूर यांच्याविरोधात चार्जशीट दाखल झाली आहे. एसआयटीनंही चौकशी पूर्ण केलेली आहे. न्यायालयानं 5 जूनला थरूर यांना समन्स बजावून सात जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं होतं. शशी थरूर यांच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्यानं त्यांच्याविरोधात कारवाई करता येऊ शकते, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.