Congress President Election : थरूर की खरगे, काँग्रेस अध्यक्ष काेण? उद्या होणार फैसला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 07:02 AM2022-10-18T07:02:10+5:302022-10-18T07:03:08+5:30

प्रतिनिधींच्या अभूतपूर्व उत्साहात देशभरात ९६ टक्के मतदान

Tharoor or Kharge who is the Congress president The decision will be made tomorrow | Congress President Election : थरूर की खरगे, काँग्रेस अध्यक्ष काेण? उद्या होणार फैसला

Congress President Election : थरूर की खरगे, काँग्रेस अध्यक्ष काेण? उद्या होणार फैसला

Next

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अभूतपूर्व उत्साहात एकूण ९ हजार ९०० पैकी सुमारे ९ हजार ५०० प्रदेश काँग्रेस समिती प्रतिनिधींनी मतदान केल्याची माहिती पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी सोमवारी दिली. निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे की शशी थरूर बाजी मारणार याचा निकाल बुधवारी (दि.१९) लागणार आहे.

मिस्त्री म्हणाले की, एकूण मतदान सुमारे ९६ टक्के झाले. लहान राज्यांमध्ये ते जवळपास १०० टक्के झाले. केंद्रावर कोणतीही प्रतिकूल घटना घडली नाही. अंतर्गत लोकशाही म्हणजे काय हे काँग्रेस पक्षाने दाखवून दिले आहे. सकाळी १० वाजता दिल्ली मुख्यालयात आणि देशभरातील राज्य कार्यालयांतील पक्षाच्या मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. पाच वाजता मतदान संपले.

या दिवसाची खूप वाट पाहिली : सोनिया गांधी
काँग्रेस अध्यक्षपदाचे मतदान सुरू असताना, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या की, त्या या दिवसाची दीर्घकाळ वाट पाहत होत्या. 
सोनिया गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी काँग्रेस मुख्यालयात एकत्र येऊन मतदान केले. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनीदेखील मुख्यालयात  मतदान केले. 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी येथील मुख्यालयात सर्वप्रथम मतदान केले. सरचिटणीस जयराम रमेश, अंबिका सोनी, अजय माकन आणि विवेक तनखा यासारख्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या मुख्यालयात मतदान केले. 
उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटकातील बंगळुरूत तर शशी थरूर यांनी केरळमधील तिरुअनंतपुरम येथे मतदान केले. 

राहुल गांधींचे ‘कंटेनर बूथ’मध्ये मतदान
३५०० किलोमीटरच्या भारत जोडो यात्रेवर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील संगनकल्लू येथे मतदान केले.तेथे मतदानासाठी विशेष कॅम्प लावला होता. कंटेनरलाच पोलिंग बूथचे रूप दिले होते. राहुल गांधी यांच्यासह सुमारे ५३ सदस्यांनी मतदान केले. 

महाराष्ट्रात ५४२ प्रतिनिधींनी हक्क बजावला
मुंबई : निवडणुकीत महाराष्ट्रात ९६ टक्के मतदान झाले असून, प्रदेश काँग्रेसच्या ५६१ पैकी ५४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवनात मतदान पार पडले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 

Web Title: Tharoor or Kharge who is the Congress president The decision will be made tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.