जम्मू काश्मीरमधील पूँछ-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी भर पावसात भारतीय सैन्याच्या लष्करी वाहनाने पेट घेतला होता. या आगीत वाहन जळून खाक झाले असून पाच जवान शहीद झाले आहेत. सुरुवातीला वीज पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतू दहशतवाद्यांनी वाहनावर ग्रेनेड फेकल्याने आग लागल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
या वाहनातून एकूण सहा जवान प्रवास करत होते. यापैकी पाच जण शहीद झाले आहेत. तर एक गंभीर जखमी झाला आहे. या जवानावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. राष्ट्रीय रायफल युनिटचे हे जवान दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तैनात करण्यात आले होते. त्यांच्यावर मोहिमेवर जात असताना हा हल्ला झाला आहे.
आर्मीच्या ट्रकवर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला आहे. यानंतर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. मुसळधार पाऊस आणि कमी प्रकाशाचा फायदा घेत दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आणि पळून गेले आहेत. ग्रेनेड वाहनात फुटल्याने आग लागली, यात जखमी झालेले जवान होरपळले आणि त्यांचा मृत्यू झाला.
दहशतवाद्यांचा शोध घेण्य़ासाठी सैन्याने शोधमोहिम हाती घेतली आहे. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर पोलिसांनी हा मार्ग बंद केला आहे. लोकांना दुसऱ्या मार्गाचा वापर करण्यास सांगितले आहे.