बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अनेक वर्षांपासून बंद असलेला मुख्यमंत्री कार्यालयाचा दक्षिणाभिमुख दरवाजा आज उघडला व त्याच दरवाजातून दालनात प्रवेश केला. तत्कालीन मुख्यमंत्री जे. एच. पटेल यांना निवडणुकीत अपयश आल्यानंतर अपशकुनी मानून १९९९ मध्ये या दरवाजाला टाळे लावण्यात आले होते. २०१३ मध्ये सिद्धरामय्या पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी हा दरवाजा उघडला होता. २०१८ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर हा दरवाजा पुन्हा बंद झाला. त्यानंतरच्या मुख्यमंत्र्यांनी तो बंद ठेवणेच इष्ट मानले. मुख्यमंत्री दालनाचा दक्षिणेकडील दरवाजा उघडल्यास पटेल यांच्याप्रमाणे आपलीही राजकीय कारकीर्द धोक्यात येईल, अशी त्यांची समजूत होती. तर्कसंगत नसलेल्या बाबींच्या विरोधात उभे राहणारे अशी प्रतिमा असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हा दरवाजा आज पुन्हा उघडला.
त्यानंतर त्यांनी ट्रीट केले की, विधानसभेतील मुख्यमंत्री कार्यालयाचा दक्षिणेकडील दरवाजा आज उघडला. वास्तूदोषामुळे गेल्या काही वर्षांपासून तो बंद होता. मी त्याच दरवाजातून कार्यालयात आलो. जेथे खेळती हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश असतो ती वास्तू चांगली असे मी मानतो. जर तुमची मानसिकता शुद्ध असेल तर सर्व काही शुभच होईल. (वृत्तसंस्था)
सिद्धरामय्यांवरही झाली होती टीकासिद्धरामय्या पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्यानंतर एकदा त्यांच्या सरकारी कारवर कावळा बसला होता. त्यानंतर त्यांनी ती कार बदलली तेव्हा मुख्यमंत्री शकुन- अपशुकन मानतात म्हणून त्यांच्यावर टीका झाली होती. तथापि, सिद्धरामय्या यांनी कार जुनी झाल्याने बदलली, असा खुलासा तेव्हा केला होता.