लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, जे मोबाइल नंबर वापरात नसल्यामुळे निष्क्रिय केले जातात किंवा ग्राहकांच्या विनंतीवरून बंद केले जातात ते नंबर किमान ९० दिवस कोणत्याही ग्राहकाला दिले जात नाहीत.
मोबाइल नंबर बंद केल्यानंतर किंवा वापर न केल्यामुळे निष्क्रिय झाल्यानंतर डेटाच्या कथित गैरवापरावर चिंता व्यक्त करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. ट्रायच्या प्रतिज्ञापत्राचा विचार करणाऱ्या न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भट्टी यांच्या खंडपीठाने सांगितले की, मागील फोन नंबरशी संबंधित व्हॉट्सॲप खाते डिलीट करून आणि लोकल डिव्हाइस मेमरी क्लाउड किंवा ड्राइव्हमध्ये संग्रहित डेटा काढून टाकून ग्राहक डेटाचा गैरवापर रोखू शकतो.
खंडपीठाने म्हटले की, आम्ही सध्याच्या याचिकेवर पुढील सुनावणी घेण्यास इच्छुक नाही. ट्रायच्या प्रतिज्ञापत्राची दखल घेत खंडपीठाने याचिका ऐकण्यास नकार देत ती फेटाळून लावली.