एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये झालेलं बंड आणि त्यानंतर राज्यात झालेल्या सत्तांतराबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पूर्ण झाली आहे. या सुनावणीमध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे वकील, ठाकरे गटाच्या वकीलांनी जोरदार युक्तिवाद केले. दोन्हीकडच्या वकिलांचा युक्तिवाद आणि सरन्यायाधीशांकडून त्याबाबत विचारण्यात येत असलेले प्रतिप्रश्न यामुळे या सुनावणीला नवनवी वळणं मिळालं आहेत. दरम्यान, सुनावणी शेवटच्या टप्प्यात आली असताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विचारलेल्या एका प्रश्नामुळे ठाकरे गटाची धाकधुक वाढली आहे.
आज सुनावणीदरम्यान, ठाकरे गटाच्या वकिलांकडून पूर्वस्थिती पुन:स्थापित करून ठाकरे सरकार पुन्हा स्थापित करावे अशी विनंती कोर्टात करण्यात आली होती. त्यावर सरन्यायाधीसांनी पुम्ही सरकार पुन:स्थापित करा असं म्हणत आहात, पण तुम्ही तर राजीनामा दिला आहे, असा सवाल केला. त्यावर ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी त्या राजीनाम्याला काही उत्तर नाही असं उत्तर दिलं. त्यावर सरन्यायाधीशांनी इथे ज्या सरकारने राजीनामा दिलाय, त्या सरकारला पुनस्थापित करण्याची मागणी केली जात आहे अशी टिप्पणी केली.
तर न्यायमूर्ती शाह यांनी ज्या मुख्यमंत्र्यांनी फ्लोअर टेस्टचा सामना केला नाही त्याला कोर्ट पुनस्थापित कसं करू शकते असा प्रश्न केला. त्यावर ठाकरे गटाचे वकील सिंघवी यांनी न्यायव्यवस्थेने कुणाला पुनस्थापित करायचे नाही आहे. तर पूर्वस्थिती बहाल करायची आहे, असं उत्तर दिलं.
त्यानंतर सिंघवी यांनी राज्यपालांनी उचललेल्या बेकायदेशीर पावलांबाबतची केस कोर्टात प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सरन्यायाधीशांनी केवळ राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यास सांगितले म्हणून उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला का असा प्रश्न विचारला. तसेच विश्वासदर्शक ठराव विरोधात जाणार याची कल्पना आल्याने उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, हेही तुम्ही प्रांजळपणे मान्य करताय, असं निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवलं. त्यामुळे सत्तासंघर्षाच्या सुनावणीतील अखेरच्या टप्प्यात सरन्यायाधीशांनी नोंदवलेलं हे निरीक्षण निर्णायक ठरू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षावर काल झालेल्या सुनावणीवेळी राज्यपालांची बाजू मांडणाऱ्या तुषार मेहता यांच्यावर सरन्यायाधीशांकडून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली होती. तसेच या सर्व घटनाक्रमातील राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढण्यात आले होते.