ठरलं! ज्योतिरादित्य शिंदेंना मिळणार 'हे' मंत्रालय?; मोदींच्या कॅबिनेटमध्ये होणार समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 03:51 AM2020-03-12T03:51:39+5:302020-03-12T03:52:29+5:30
व्होडाफोन आयडियासारख्या कंपन्या एजीआर रक्कमेमुळे व्यवसाय बंद करावा लागू शकेल असे म्हटलेल्या आहेत.
संतोष ठाकूर । हरीष गुप्ता
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असून त्यांना राज्यसभेत पाठवून केंद्रीय मंत्रिमंडळातही जागा मिळेल, असे दिसते. शिंदे यांचा अनुभव वाणिज्य क्षेत्रात असल्यामुळे त्यांना त्याच मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते. शिंदे यांच्यासाठी जे मंत्रालय योग्य मानले जात आहे त्यात रेल्वे, अवजड उद्योग, दूरसंचार, उर्जा मंत्रालयाचाही समावेश आहे.
सूत्रांनुसार शिंदे यांनी काँग्रेसच्या राजवटीत दूरसंचार आणि वाणिज्यसह उर्जा मंत्रालयाचाही कार्यभार पाहिला आहे. ते दिवसरात्र काम करू शकतात. त्यामुळे सरकार त्यांच्या अनुभवाचा चांगला उपयोग होईल अशा मंत्रालयात आणू शकते. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात एकापेक्षा जास्त मंत्रालयांची जबाबदारी असलेले अनेक मंत्री आहेत. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालयाचाही अतिरिक्त प्रभार आहे. शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्यानंतर जावडेकर यांना ही अतिरिक्त जबाबदारी दिली गेली. सध्या आर्थिक आघाडीवर देशच नव्हे तर जगाचीही प्रकृती खराब आहे. वाहन उद्योगही सुस्तावला असल्यामुळे त्याला पूर्णवेळ मंत्र्याची बऱ्याच दिवसांपासून गरज आहे. कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे दूरसंचार आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयदेखील आहे.
व्होडाफोन आयडियासारख्या कंपन्या एजीआर रक्कमेमुळे व्यवसाय बंद करावा लागू शकेल असे म्हटलेल्या आहेत. ज्योतिरादित्य शिंदे दूरसंचार मंत्री असतानाडाक विभागाचा कायापालट करण्यासाठी ऐरो योजना सुरूझाली होती. त्याचे सकारात्मक परिणाम दिसले होते.
शिंदे व्यवसायाने इन्व्हेस्टमेंट बँकर होते. त्यामुळे ते मंत्रालयही त्यांच्यासाठी उचित मानले जात आहे. ते उर्जा आणि वाणिज्य मंत्रीही होते. परंतु, वाणिज्य मंत्रालय त्यांना दिल्यास जाणकारांना एक मोठी अडचण वाटते ती म्हणजे अमेरिकेसोबत व्यापार कराराची प्रारंभीची चर्चा पीयूष गोयल यांनी केली होती.
शिंदे-राहुल भेटीचे प्रयत्न वाया
काँग्रेस पक्ष सोडण्याआधी ज्योतिरादित्य शिंदे यांंनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला; परंतु त्यांचे प्रयत्न वाया गेले. त्यांनी राहुल गांधी याच्या १२ तुघलक रोड निवास्थानी तीन फोन केले. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात असले तरी त्यांच्याकडे राहुल गांधी यांच्या मोबाईल फोनचा नवीन नंबर नाही. त्यांनी अलीकडेच मोबाईल नंबर बदलला आहे. अनेक नेत्यांकडे त्यांचा मोबाईल नंबर नाही. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांनी मागच्या आठवड्यात राहुल गांधी याच्या निवासस्थानी फोन केला होता. उच्चपदस्थ सूत्रांनुसार राहुल गांधी यांना निरोप देण्याचे आश्वासन त्यांच्या स्वीय सचिवांनी दिले होते. मात्र, सर्व प्रयत्न वाया गेल्याने ते कमालीचे निराश झाले.