नवी दिल्ली : सराव सामन्यात अखेरच्या दिवशी शानदार शतकी खेळी करीत फॉर्मात असल्याचे संकेत देणारा रोंची आणि दुसऱ्या बाजूला सूर गवसण्यासाठी संघर्ष करीत असलेला अनुभवी फलंदाज मार्टिन गुप्तील यांच्यापैकी भारताविरुद्ध २२ सप्टेंबरपासून प्रारंभ होत असलेल्या कसोटी मालिकेत कुणाची निवड करायची, असा पेच न्यूझीलंड संघ व्यवस्थापनाला पडला आहे. दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर रविवारी अनिर्णीत संपलेल्या तीन दिवसीय सराव सामन्याच्या अखेरच्या दिवशी रोंचीने १०७ धावांची शानदार शतकी खेळी केली. त्याला या लढतीत गुप्तीलच्या साथीने सलामीला पाठविण्यात आले होते. गुप्तीलने पहिल्या डावात सलामीला १५ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात तो खाते न उघडताच माघारी परतला. त्यामुळे गुप्तीलचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये २२ सप्टेंबरपासून भारताविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होत आहे. अशा स्थितीत अनुभवी गुप्तील व रोंची यांच्यादरम्यान सलामीवीराच्या स्थानासाठी चुरस अनुभवायला मिळू शकते. गुप्तीलची आशिया खंडातील कसोटी क्रिकेटमधील सरासरी २०.६८ अशी आहे. सामन्यानंतर बोलताना रोंची म्हणाला, ‘मला केवळ दुसऱ्या डावात सलामीला जाण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यास उत्सुक होतो. जर मला डावाची सुरुवात करण्यास सांगण्यात आले तर मला आनंदच होईल, पण हा निर्णय अखेर प्रशिक्षक माईक हेसन व कर्णधार केन विलियम्सन यांना घ्यायचा आहे.’रोंची पुढे म्हणाला, ‘माझे काम केवळ खेळणे आहे. संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यास उत्सुक आहे. मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यास प्रयत्नशील राहील. माझ्याकडे कुठली भूमिका सोपविण्यात येते, याची कल्पना नाही. हे सर्वकाही निवड समितीवर अवलंबून आहे. संघव्यवस्थापनाने सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज आहे.’ (वृत्तसंस्था)
रोंची की गुप्तील ?
By admin | Published: September 19, 2016 3:53 AM