समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन या आठवड्यात संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान जगदीप धनखड यांच्यावर टीकास्त्र सोडल्यामुळे चर्चेत होत्या. मात्र आता जया बच्चन यांनी त्यांच्या निरोपाच्या भाषणादरम्यान सभागृहातील सर्व सदस्यांची माफी मागितली आहे. मला राग आला असला तरी कुणाला दुखावण्याचा हेतू नव्हता, असं त्यांनी स्पष्ट केलं.
"लोक मला अनेकदा विचारतात की मला राग का येतो?... हा माझा स्वभाव आहे, मी स्वतःला बदलू शकत नाही. जर मला एखादी गोष्ट आवडली नाही किंवा ती पटली नाही, तर मला राग अनावर होतो. जर मी तुमच्यापैकी कोणाशीही अनुचित वर्तन केलं असेल किंवा काही पर्सनल झालं असेल तर मी माफी मागते" असं जया बच्चन यांनी राज्यसभेत आपल्या निरोपाच्या भाषणात म्हटलं आहे.
ज्या 68 सदस्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत पूर्ण होत आहे, त्यात जया बच्चन यांचाही समावेश आहे. आपल्या 20 वर्षांच्या अनुभवांचा उल्लेख करताना जया बच्चन म्हणाल्या, "20 वर्षे हा आयुष्यातील खूप मोठा काळ आहे. मला अनेक चांगले-वाईट अनुभव आले. सर्वात चांगला अनुभव म्हणजे माझं कुटुंब खूप मोठं झालं"
"माझे सहकारी मला अनेकदा विचारतात की, मला इतका राग का येतो?... मी काय करू, माझा स्वभावच असा आहे की मला जे काही चुकीचं वाटतं, ते मी सहन करू शकत नाही, मी ते व्यक्त करते. माझ्या बोलण्याने जर कोणाला दुखावलं असेल तर मी माफी मागते" असं जया बच्चन यांनी म्हटलं आहे.