राजस्थानमध्ये काही गुंडांनी एबीव्हीपीच्या नेत्याची लाठ्याकाठ्या आणि सळ्यांनी मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दरम्यान, बचावासाठी मध्ये पडलेल्या मृताच्या सहकाऱ्यालाही आरोपींनी बेदम मारहाण केली आहे. त्यानंतर आरोपी थारमध्ये बसून फरार झाले. ही घटना काल रात्री १२ च्या सुमारास घडली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये गाडीच्या भाड्यावरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी मृत नरेंद्र प्रजापत याचे काका प्रेमचंद प्रजापत यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच सहा जणांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. आता पोलीस आरोपींच्या अटकेसह या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेमचंद प्रजापत यांनी तक्रारीमध्ये लिहिलं की, मी, माझा पुतण्या नरेंद्र प्रजापत, सत्येंद्र उर्फ पीपी, चंद्रभान शर्मा, विकास जांगिड, अर्जुन सिंह आणि अहमद डाबला मिळून अर्जुन सिंह याच्या दुकानावर पार्टी करत होतो. यावेळी बुंटीया येथील अमित उर्फ मितला आणि शुभम ढाका यांनी आठवडाभरापूर्वी गाडीच्या भाड्यावरून मारहाण केली होती आणि जिवे मारण्याची धमकी दिली होती, असं नरेंद्रने सांगितलं.
पार्टी केल्यानंतर रात्री सुमारे १२ वाजता आम्ही चुरूच्या दिशेने रवाना झालो. नरेंद्र आणि अमजद एका दुकाचीवरून पुढे जात होते. तर आम्ही मागून कारमधून जात होतो. तेवढ्यात डाबला गावाजवळ मागून एक काळ्या रंगाची थार गाडी आली. त्यांनी रस्त्यामध्ये गाडी आडवी लावत नरेंद्रच्या दुचाकीला रोखले. त्यानंतर थारमधून अमित उर्फ मितला, शुभम ढाका आणि आणखी चार जण उतरले. त्यांनी नरेंद्रवर हल्ला केला. त्यांनी नरेंद्रला बेदम मारहाण केली. अमजदने मध्ये पडून बचाव करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी त्यालाही मारहाण केली. त्यानंतर आरोपी थारमध्ये बसून फरार झाले. नरेंद्रला डीबी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.