सचिन जवळकोटेसैफई : अखिलेश यादव यांच्या कार्यपद्धतीबद्दल खुद्द त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येच नाराजी. मात्र, मुलायमसिंहांबद्दल साऱ्याच पक्षातील नेत्यांना आजही आदर. त्यांनी त्यांच्या सैफईसारख्या इवल्याशा गावात करून दाखविलेला चमत्कार संपूर्ण देशाला अचंबित करणारा. आठ ते दहा हजार लोकसंख्या असलेल्या या गावात विमानतळ, आंतरराष्ट्रीय स्टेडियम, आयुर्विज्ञान विश्वविद्यालय अन् दीड हजार खाटांचं मेडिकल कॉलेज यासह असंख्य संस्था. इटावा जिल्ह्यातील हे एक छोटंसं गाव. मात्र, मुलायमसिंह यांच्या दूरदृष्टीमुळे इथला कायापालट लक्षणीय.
याच गावात त्यांचा जन्म. इथंच शिक्षण झालं. शिक्षक म्हणूनही इथंच नोकरी लागली. राजकारणात आल्यानंतर मात्र त्यांनी मागं वळून कधीच पाहिलं नाही. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यापासून संरक्षणमंत्र्यापर्यंत अनेक उच्च पदं त्यांनी भूषविली. मात्र, घरातल्या भांडणामुळे सरत्या वयात ते हतबल झाले. सध्या ते राजकारणापासून अलिप्त, तरीही इथल्या परिसरात राजकारण चालतं केवळ ‘नेताजी’ या शब्दावरच.
हा पट्टा दूध-दुभत्यांचा. बहुतांश आलिशान बंगल्यांसमोर इम्पोर्टेड गाडीच्या बाजूलाच भारदस्त म्हशीही मोठ्या कौतुकाने बांधलेल्या. इथली श्रीमंती गाई-म्हशींच्या संख्येवर मोजणाऱ्या या गावात उत्तर प्रदेशातला सर्वात मोठा ‘सैफई महोत्सव’ही भरतो. कैक दशके डोळे मिटून निवडून येणाऱ्या मुलायमसिंहांच्या या करहल मतदारसंघात यंदा पुत्र अखिलेशांनी अर्ज भरलाय. यादवांसाठी हा सर्वात सुरक्षित मतदारसंघ. पुत्राने आयुष्यभर कितीही उभा दावा मांडला, तरी शेवटी त्याच्यासाठी कामाला येते पित्याची पुण्याई, हेच इथे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
बंगला नहीं... कोठी बोलो!याच परिसरात तब्बल ३५० हेक्टरमध्ये इटावा लायन सफारी. जंगलात मुक्तपणे फिरणाऱ्या खऱ्याखुऱ्या सिंहांना पाहण्यासाठी रोज शेकडो लोक या ठिकाणी येतात. मात्र, मुलायमसिंहांचा भला मोठा बंगला पाहूनही पर्यटक भारावतात. रस्त्यावरच्या एका तरुणाला विचारलं, ‘इस बंगले में अब कौन रहता है?’ तेव्हा तो झटकन उत्तरला, ‘बंगला मत बोलो... नेताजी की कोठी बोलो. ये शान है हमरे गांव की.’