नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील बैठक तब्बल दीड तासांनी संपली आहे. या बैठकीवेळी पक्षाचे नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे उपस्थित होते. दिवाळीच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने ही भेट घेतल्याचं प्रफुल पटेल यांनी सांगितले असले तरी या दीड तासांच्या बैठकीत राज्यातील विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.
अजित पवार आणि अमित शाह यांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे. कारण आज सकाळीच अजित पवार यांनी कौटुंबिक कार्यक्रमावेळी शरद पवारांची भेट घेतली होती. पुण्यातील प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी पवार कुटुंबीय दिवाळीनिमित्त स्नेहभोजन करण्यासाठी पोहचले होते. त्यावेळी अजित पवारही उपस्थित होते. नुकतेच राष्ट्रवादी पक्षाची केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. त्यात अजित पवार गटाने बोगस प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा दावा करत अजितदादा गटावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही भेट झाली.
राज्यात मराठा आरक्षण, ओबीसी-मराठा वाद पेटला असताना अजित पवार गेल्या काही दिवसांपासून सरकारी कार्यक्रमात सक्रीय नव्हते. अजित पवारांना डेंग्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. त्याचसोबत अजित पवारांना खबरदारी म्हणून पुढील काही दिवस लोकांना भेटता येणार नाही असं सांगितले जात होते. मात्र आज शरद पवारांसोबत झालेली भेट आणि त्यानंतर तातडीने दिल्लीला जाऊन अमित शाह यांची भेट घेणे यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
त्यातच शरद पवार हे आधीच भाजपासोबत येणार होते, परंतु त्यांची गाडी कुठे थांबली माहिती नाही. परंतु शरद पवार आमच्यासोबत आल्यास १०० टक्के स्वागत आहे असं विधान भाजपा नेते प्रविण दरेकरांनी केले. तर आमचे राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक दुरावा नाही. आमचे कुणासोबतही वैर नाही. सगळ्यांशी आमचे चांगले, जिव्हाळ्याचे संबंध आहेत असं म्हणत राजकीय आणि वैयक्तिक आयुष्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं स्पष्टीकरण सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या भेटीनंतर दिले.