दोन दिवसांपूर्वी खलिस्तानी समर्थकांनी भारतीय दुतावासावरील तिरंग्याचा अपमान केला होता. ब्रिटनमधील दुतावासासमोर खलिस्तानींनी आठवड्याभरात दोनदा हिंसक आंदोलन केले होते. यावर वारंवार निषेध नोंदवूनही ब्रिटीश सुरक्षा यंत्रणेने काही कारवाई केली नव्हती. यामुळे भारताने देखील ब्रिटिशांना जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
कूटनीतीद्वारे भारत सरकारने नवी दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालय आणि ब्रिटिश उच्चायुक्तांच्या निवासस्थानासमोरची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे. या दोन्ही इमारतींसमोर बॅरिकेड्स लावून बंदुकधारी पोलीस सुरक्षा असते. ती हटविण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे अन्य देशांच्या उच्चायुक्तालयासमोर नेहमीप्रमाणेच सुरक्षा आहे. या बॅरिकेड्सना सुरक्षा व्यवस्थेचा पहिली फळी मानली जाते.
खलिस्तान समर्थकांनी अलीकडच्या काळात ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा येथील भारतीय उच्चायुक्तालय किंवा वाणिज्य दूतावासांसमोर हिंसक निदर्शने केली आहेत. भारताने या सर्व देशांकडे चिंता व्यक्त केली होती. रविवारच्या घटनेनंतर भारत सरकारने ब्रिटनच्या भारतातील उपउच्चायुक्तांना बोलावून तीव्र निषेध व्यक्त केला होता. परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या प्रभारी राजदूतालाही बोलावले आणि सॅन फ्रान्सिस्कोमधील दूतावासावरील हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली. भारताने या दोन्ही देशांना आपल्या दूतावासांची सुरक्षा वाढवावी, असे अनेकदा सांगितले आहे.
आजचे हे पाऊल ब्रिटनला कुटनीतीत अडकविण्यासाठी उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.