नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील अनेक भागात पुराचा धोका वाढला आहे. हथनी कुंड बॅरेजमधून पाणी सोडल्यानंतर यमुना नदीच्या पाण्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दिल्लीतील काही रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. यमुना बँक मेट्रो स्थानकावरील प्रवेश आणि बाहेर जाण्याचे मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. याशिवाय अनेक जलशुद्धीकरण केंद्रे बंद करावी लागली.
यमुनेच्या पाण्याची पातळी वाढल्याने वजीराबाद, चंद्रावल आणि ओखला येथील वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट बंद करावे लागले आहेत. त्यामुळे दिल्लीतील काही भागात पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. यमुनेचे पाणी कमी होताच आम्ही ते लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करू. जलसंकटामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल वजीराबाद जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.
यमुनेच्या काठावरील अनेक भाग पाण्याखाली जात आहे. रिंगरोडपर्यंत पाणी पोहोचले आहे. काश्मिरे गेट बसस्थानकही धोकादायक स्थितीत आहे. राजघाट, आयटीओ, पुराणा किला परिसर जलमय झाला आहे. लाल किल्ल्यामागील परिसरात देखील पाणी शिरले आहे. जुनी दिल्ली रेल्वे स्थानकाकडे जाणारे रस्ते आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सखल भागातील घरे पाण्यात बुडाली आहेत.
यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. दिल्लीतील अनेक भाग पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. यमुनेच्या पाण्याची पातळी २०८ मीटरच्या पुढे गेली आहे. यापूर्वी १९७८मध्ये प्रथमच लोखंडी पुलाजवळील पाण्याची पातळी २०७.४९ मीटर नोंदवण्यात आली होती. यमुनेला आलेल्या पुरामुळे सर्व मोठ्या नाल्यांचा प्रवाह पूर्णपणे थांबला आहे. यमुना नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढल्यास दिल्लीसाठी मोठे संकट उभे राहू शकते.
हिमाचलमध्ये २००० पर्यटकांची सुटका
हिमाचलच्या कासोलमध्ये अडकलेल्या किमान २,००० पर्यटकांना बाहेर काढण्यात आले आहे. हिमाचलमध्ये शिमला-किन्नौर मार्गावर एक वाहन सतलज नदीत पडून एकाच कुटुंबातील चार सदस्य बेपत्ता झाले आहेत. पंजाबच्या फरीदकोट जिल्ह्यात घराचे छत कोसळून एका दाम्पत्यासह त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. पंजाबच्या पटियाला, रूपनगर, मोगा, लुधियाना, मोहाली आदी भागांतून १० हजारांवर लोकांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये पौडी जिल्ह्यात एक कार पूर आलेल्या नदीत कोसळून त्यातील पाचपैकी तीन व्यक्तींचा मृत्यू झाला.