नवी दिल्ली - संपत्तीवरून अनेकदा भांडण झाल्याचं आपण पाहतो. कधी कधी ही भांडणं टोकाला जातात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. संपत्तीच्या वादातून दोन भावांनी स्मशानभूमीत आईच्या पार्थिवाला वेगवेगळा मुखाग्नी दिला आहे. मालमत्तेवरून सुरू असलेल्या या वादाचे हे प्रकरण सध्या न्यायालयात असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 105 वर्षीय आई गीता देवी यांचे निधन झाले. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह रिविलगंज येथील सिमरिया घाटावर नेण्यात आला. जिथे त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य आणि जवळचे नातेवाईक देखील होते.
इंद्रदेव राय यांच्या पत्नी गीता देवी यांचा मोठा मुलगा सिंगेश्वर राय आईला मुखाग्नी देण्यासाठी पोहोचला. तोपर्यंत त्याचा धाकटा भाऊ दिनेश्वर रायही मुखाग्नी देण्यासाठी तयार झाला. त्यानंतर द्विधा परिस्थिती निर्माण झाली. असं म्हटलं जातं की परंपरेनुसार मोठा मुलगा वडिलांना आणि लहान मुलगा आईला अग्नी देतो. इंद्रदेव राय यांच्या पत्नी गीता देवी त्यांचा मोठा मुलगा सिंगेश्वर राय यांच्यासोबत त्यांच्या घरी राहत होत्या. त्यांचे पती पोलीस सेवेतून निवृत्त झाले होते, त्यांना पेन्शन मिळत असे. दोन भावांमध्ये त्यावरूनही अधूनमधून वाद होत होते.
आईच्या मृत्यूनंतर धाकट्या भावाला वाटले की मोठा भाऊ सर्व मालमत्ता हडप करेल, त्यामुळे आपणही मुखाग्नी द्यावा जेणेकरून आपला समान वाट्याचा हक्क कायम राहील. मग काय घाटावर दोन्ही भावांनी मिळून आईला अग्नी दिला. दोन्ही भावांच्या नावावर वडिलोपार्जित घरासह शहर आणि रिविलगंजमध्ये जमीन आहे. आई गावी एकटी राहिल्यानंतर तिचा मोठा मुलगा सिंगेश्वर याने तिला छपरा शहरातील आपल्या घरी नेऊन आपल्याजवळ ठेवण्यास सुरुवात केली. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.