दिल्ली-
मोदी सरकारकडून काल सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर टीका करताना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली. जनतेच्या पैशानं २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका कशा लढल्या जातील याचं उत्तम उदाहरण म्हणजे काल सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प आहे, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. ते दिल्लीत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. ज्या मुंबईकडून देशाला सर्वाधिक महसूल मिळतो. त्या मुंबई आणि महाराष्ट्राला बजेटमधून काय मिळालं? अर्थसंकल्प सादर करण्याआधी साऊथ ब्लॉकमध्ये जो गाजर हलवा तयार केला जातो. त्यातील चमचाभर हलवा देखील मुंबईच्या वाट्याला आलेला नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. मुंबईतील खासदारांच्या अनेक मागण्या होत्या. पण त्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं गेलं आहे. मुंबईतील खासदारांच्या हातावर वाटाण्याच्या अक्षता देण्याचं काम भाजपा सरकारनं केलं आहे, असंही ते पुढे म्हणाले.
भाजपानं देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केलीभारतीय जनता पक्षानं देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आहे. शेअर बाजारातील पडझडीचा हिशोब भाजपनेच बघावा. देशाचे पंतप्रधान महिन्याभरात दोनवेळा मुंबई दौऱ्यावर येतात. हे सारं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं जात आहे. पंतप्रधानांनी मुंबईत यावं त्यांचं स्वागतच आहे. पण येताना मुंबईकरांसाठी काहीतरी घेऊन यावं. रिकाम्या हातानं येता आणि झोळी भरुन घेऊन जाता. आजवर हेच मुंबईचं दुर्दैव राहिलं आहे, असंही संजय राऊत म्हणाले.