यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुमत हुकल्यानंतर भाजपासमोरील समस्या सातत्याने वाढत आहेत. त्यातच काही महिन्यांवर आलेल्या झारखंडमधीस विधानसभा निवडणुकीमुळे या राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते चंपाई सोरेन यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने राज्यातील समिकरणं बदलली आहेत. तर दुसरीकडे भाजपाच्या एका बड्या माजी नेत्याने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने नव्या पक्षाची स्थापना करण्याचे संकेत देत भाजपाचं टेन्शन वाढवलं आहे.
भाजपाचे एकेकाळचे वरिष्ठ नेते असलेले माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात परतण्याची तयारी करत आहेत. तसेच यशवंत सिन्हा हे त्यांचा स्वत:चा पक्ष स्थापन करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली पक्ष स्थापन करण्याचा निर्णय हा हजारीबार येथे झालेल्या अटल विचार मंचच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. हजारीबाग येथे अटल विचार मंचची बैठक नुकतीच झाली. प्राध्यापक सुरेंद्र सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीमध्ये वाजपेयी सरकारमध्ये परराष्ट्र आणि वित्त मंत्रालय सांभाळणारे यशवंत सिन्हा हेही उपस्थित होते.
अटल विचार मंचच्या बैठकीमध्ये झारखंडमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीतीबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर नव्या राजकीय पक्षाच्या स्थापनेचा प्रस्ताव संमत करण्यात आला. यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या या पक्षाचं नाव माजी पंतप्रधान अटल बिहारी यांच्या नावावर असेल.
यशवंत सिन्हा म्हणाले की, आजचं राजकारण हे चाटुकारितेचं राजकारण बनलं आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांवर वाटचाल करून स्वच्छ चारित्र्याचं राजकारण करून समाजातील प्रत्येक वर्गाचा उत्कर्ष करया येऊ शकतो. त्यांच्या विचारांवर चालण्याची आवश्यकता आहे. यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची स्थापना कधी होणार, याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही.
यशवंत सिन्हा यांनी जनता दल पक्षातून आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती. त्यानंतर ते भाजपामध्ये आले. नंतर ते ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये होते. २०२२ मध्ये त्यांनी विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.