नवी दिल्ली – मी समाजासाठी आहे परंतु मी ज्या खोट्या समाजवादावर टीका करतो ती पूर्ण घराणेशाही आहे. लोहिया यांचं कुटुंब कुठे दिसत नाही. जॉर्ज फर्नांडिस यांचं कुटुंब कुठे नजरेस येत नाही. नितीश बाबूचं कुटुंब कुठे दिसत नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर कडाडून टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) म्हणाले की, एकदा कुणीतरी मला चिठ्ठी पाठवली त्यात उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या कुटुंबातील ४५ लोकं कुठल्या ना कुठल्या पदावर आहेत. त्यांच्या संपूर्ण कुटुंबात २५ वर्षाहून अधिक वयाच्या प्रत्येक व्यक्तीला निवडणुकीत लढण्याची संधी मिळाली आहे असं सांगितले होते. काही नेते स्वार्थासाठी एकमेकांचा विरोध करत असतात. मागील ५० वर्ष त्यांनी तेच केले. प्रत्येक गोष्टीत देशाच्या लोकांचं विभाजन केले आणि राज्य केले असं त्यांनी सांगितले.
तसेच भारतीय लोकशाहीसाठी घराणेशाही हा सर्वात मोठा शत्रू आहे. जेव्हा कुटुंब सर्वोच्च होतं तेव्हा कुटुंब वाचवा, मग भलेही पक्ष वाचेल किंवा नाही. देश वाचेल किंवा नाही असं होतं. हे सर्व होताना त्यात प्रतिमेचं मोठं नुकसान होतं. सार्वजनिक जीवनात जितक्या जास्त प्रतिमा येतील ते येणं आवश्यक आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
नेहरुंच्या विधानावर मोदींचे स्पष्टीकरण
मी कुणाच्या आईवडिलांना, आजी-आजोबांना काही बोललो नाही. मी देशाच्या पंतप्रधानांनी काय म्हटलं ते सांगितले. मी म्हटलं होतं की, एका पंतप्रधानांचे विचार काय होते तेव्हा काय स्थिती होती. आणि आज पंतप्रधानांचे विचार काय आहेत आणि स्थिती काय आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत पंडित जवाहरलाल नेहरुंवरील चर्चेवर स्पष्टीकरण दिले.
आम्हाला ५ राज्यांत सेवा करण्याची संधी मिळेल
मी या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व राज्यांना पाहतोय. भाजपाची लाट आहे. प्रचंड बहुमताने भाजपा जिंकेल. या ५ राज्यातील जनता भाजपाला सेवा करण्याची संधी देईल. ज्या राज्यांत आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली तेथील जनतेने आम्हाला ओळखलं आहे. आमच्या कामाला पाहिलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.