हरदोई:उत्तर प्रदेशमध्ये 4 हात आणि 4 पाय असलेल्या एका बाळाचा जन्म झाला आहे. हे बाळ निरोगी असून, त्याच्या जन्मानंतर लोक त्याला 'निसर्गाचा चमत्कार' म्हणत आहेत. काही लोकांनी या मुलाची तुलना देवाशी केली. हा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी दूरुन लोक येत आहेत.
दरम्यान, डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की, हा एकच मुलगा नसून, जुळी आहेत. परंतु दुसऱ्या मुलाच्या शरीराचा विकास योग्यरित्या होऊ शकला नाही, ज्यामुळे एकाच मुलाच्या शरीरावर जास्तीचे हात आणि पाय आले. जन्मानंतर बाळाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील शाहबाद आरोग्य केंद्रात गेल्या आठवड्यात 2 जुलै रोजी या मुलाला जन्म झाला.
या मुलाच्या जन्माची माहिती आजूबाजूच्या परिसरात पसरताच त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली. शाहबाद सीएचसी केंद्रातील स्टाफ नर्स रीमा देवी वर्मा यांच्या प्रयत्नानंतर आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. बाळाला शहाबादहून हरदोई आणि नंतर लखनऊला उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश बाबू यांनी सांगितले की, ही जुळी मुले असून दुस-या बाळाचे हात-पाय मुलाच्या पोटाच्या वर जोडलेली दिसतात, परंतु ते पूर्णपणे विकसित होऊ शकलेले नाही.
17 जानेवारीलाही असाच प्रकार समोर आला होताया वर्षाच्या सुरुवातीला, 17 जानेवारी रोजी बिहारमधील कटिहार येथील सदर हॉस्पिटलमध्ये 4 हात आणि 4 पाय असलेल्या बाळाचा जन्म झाला होता. तर, डिसेंबर 2021 मध्ये बिहारच्या गोपालगंजमध्ये तीन हात आणि तीन पाय असलेल्या एका मुलाचा जन्म झाला होता.